वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या गल्लीमध्ये पुण्याहून वाळवा येथे २२ मार्चला दाखल झालेला २७ वर्षीय तरून कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणाला वारंवार ताप येत असल्यामुळे वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्देशानुसार मिरज येथे तपासणीसाठी २१ मे रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आज रात्री आठ वाजता आला. त्याला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण जाहीर करण्यात आल्यानंतर वाळवा गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. गावात भितीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण गाव तातडीने पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले.
यावेळी घटनास्थळावर वाळव्याचे प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, वाळवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील आष्ट्याचे पोलिस निरीक्षक भानुदास निंबोरे व त्यांचा पोलिस फौजफाटा, वाळवा वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी, युवानेते गौरव नायकवडी, उपसरपंच पोपट अहीर, ग्रामसेवक संपत माळी, इसाक वलांडकर, उमेश कानडे आदी मान्यवरही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदरचा सावंत नामक तरुण पुणे येथे खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. परंतु कोरोनाचा पहिला लॉकडाऊन २२ मार्चला जाहीर झाला. त्यावेळपासुन तो तरुण वाळवा येथे आला. तो परत गेला नाही, परंतु आठ दिवसांपूर्वी तो वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे नातेवाईकांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी तो गेला होता. त्यामुळे तेथेच त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबांमध्ये तीन लहान मुले असे सर्वजण मिळून वीस सदस्य राहतात. त्यांना देखील तातडीने मिरज येथे हलविण्यात आले आहे. प्रशासनाने तो परिसर सील केला असून, वाळवा गावामध्ये सर्व व्यवव्हार तातडीने बंद केले आहेत. संपूर्ण गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असल्याचे प्रशासकीय यंत्रणेने यावेळी जाहीर केले आहे. तो परिसर सील केला आहे. चिकुर्डे येथील संबधित कुटूंबाच्याही कोरोना चाचण्या केल्या जातील, असे डॉ. साकेत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले आहे.