प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लज तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे ८ रुग्ण सापडल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे. एकाचवेळी ८ रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे. आजच्या दुपारच्या तपासणी अहवालात गडहिंग्लज तालुक्यातील तब्बल ३९४ अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे दिलासादायक चित्र होते. पण, सायंकाळी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात एकाचवेळी आठ नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच रुग्ण आढळले आहेत. आता तालुक्यातील रुग्णांची संख्या पाचवरून तेरावर पोहचली आहे.
नवे रुग्ण व गावे अशी (कंसात संख्या)
सांबरे, हडलगे, तावरेवाडी, हनिमनाळ, गिजवणे (प्रत्येकी १) आणि तेरणी (३) तर यापूर्वी कळविकट्टे, काळामवाडी, भडगाव (प्रत्येकी १) आणि यमेहट्टी (२) या गावातून मिळून ५ रुग्ण सापडले होते. नव्या ८ कोरोना रुग्णांची माहिती प्रशासकीय पातळीवर घेतली जात असून उपचारासाठी त्यांना कोवीड रुग्णालयात हलवले जात आहे. नवे रुग्ण सापडलेल्या सर्व गावांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. तर या रुग्णांचा प्रवास आणि संपर्काची माहिती घेतली जात आहे.