धुळे मेडीकल कॉलेजचे प्रा. डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे तात्पुरता पदभार
प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकापडकी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली. त्याच्या जागी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. रामानंद यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी आपल्या दोन वर्षांच्या काळात येथे चांगले काम केले. कोरोना साथीतही त्यांनी शेंडा पार्क येथे आरटीपीसीआर लॅबसाठी पुढाकार घेतला होता. शुक्रवारी जळगाव जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे त्याच्या नियोजनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता असणे आवश्यक होते. सध्या या कॉलेजचा पदभार ग्रँट मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. गजभिये यांची जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी तातडीने नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी सायंकाळी त्यांना मिळाले.
दरम्यान, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने यांनी यासंदर्भात आदेश काढल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन समन्वयकांशी स्वॅबवरून वादावादी
दरम्यान, शुक्रवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापनचे जिल्हा समन्वयक संजय शिंदे सीपीआर हॉस्पिटलमध्ये आले. यापुर्वी दोनदा त्यांनी सीपीआर प्रशासनाला संगणकीय प्रणाली जोडण्याची सुचना केली होती. पण त्याची कार्यवाही झाली नव्हती. शुक्रवारी दुपारी समन्वयक शिंदे यांनी अधिष्ठाता डॉ. गजभिये यांची भेट घेतली. पण यावेळीही संगणक प्रणाली जोडली नसल्याचे दिसून आले. त्यातून या दोन्ही अधिकाऱयांत वाद झाला. त्यातूनच स्वॅब घेत नसल्याचे प्रकरण पुढे आले. यावर गाईडलाईन्सचे कारण अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी दिले. पण या वादाची सीपीआरमध्ये जोरदार चर्चा होती.
कागदोपत्री स्वॅबचे प्रकरण भोवले
अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी फेब्रुवारीत स्वतःचा स्वॅब दिला, पण त्याचा रिपोर्ट येईपर्यत त्या कार्यालयात उपस्थित रहात होत्या. नंतर त्यांनीच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले. त्यानंतर गेल्या महिन्यात होम कोरोंटाईन केलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब घेतला. शहरातील सर्व कोरोंटाईन सेंटरमध्ये त्याचा शोध घेतला, पण ती व्यक्ती मिळून आली नाही. त्यामुळे हा स्वॅब कोणाचा, याची चर्चा सुरू राहिली. अखेरीस हे स्वॅब प्रकरणच अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना भोवल्याची चर्चा आहे.