सहा घरांचे नुकसान : तीन बकरी दगावली : भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर/हुक्केरी
मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे हुक्केरी शहरातील 6 घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय 3 बकऱयांचाही मृत्यू झाला. या घटनेने या घरातील कुटुंबे उघडय़ावर आली असून सरकारकडून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाने शहराला झोडपले. यावेळी बस्तवाड रस्त्यालगत असलेल्या शोभा बसवराज कोतरु, हालाप्पा विरुपाक्ष मरडी, बसवराज विरुपाक्ष मरडी तसेच जाबापूर भागातील लगमन्ना लक्ष्मण मुत्नाळे यांच्या घरावरील पत्रे वाऱयाने उडून गेले. शिवाय मुत्नाळे यांची तीन बकरीदेखील या घटनेत मृत पावली. कोचरी रस्त्याशेजारी असणाऱया तुकाराम अंबारी यांचेही घर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तलाठी उस्ताद यांनी नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल पाठविला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









