1 जून 1986 आंदोलनातील हुतात्म्यांचा आदर बाळगा
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकच्या तत्कालीन हेगडे सरकारने संपूर्ण सीमाभागातील मराठी जनतेवर कन्नडसक्ती लादली व लोकशाहीने दिलेले भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क आणि अधिकार पायदळी तुडवले. सीमाभागात संतापाची लाट उसळली आणि सीमावासीय संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन सुरू असताना कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी केलेल्या बेछुट गोळीबारात हुतात्मे धारातिर्थी पडले.
या घटनेला 34 वर्षे पूर्ण झाली तरीही सीमावासियांच्या मनातील भावनांचा उदेक आजही होतो. आपल्या भाषेचे, आपल्या संस्कृतीचे रक्षण करताना प्राणांची आहुती दिलेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करणे, हे सीमवासियांचे आद्यकर्तव्य आहे. यंदा सोशल डिस्टन्सिंग पाळून हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा निर्णय बेळगाव शहर व तालुका म. ए. समितीने घेतला आहे.
गेले दोन महिने कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण भारतामध्ये पसरून हाहाकार माजला आहे. देशाच्या संकट काळामध्ये अस्मानी आणि सुलतानी संकटांमध्ये तसेच युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या परिस्थितीशी एकरूप होऊन सीमावासियांनी सहकार्य केले आहे. यावेळी सुद्धा केंद्र सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून हुतात्म्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे, असे ठरविण्यात आले आहे.
सोमवार दि. 1 जून रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत कार्यकर्त्यांनी गर्दी टाळून मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवून गांभीर्याने हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, पिराजी मुचंडीकर, सुनील अष्टेकर, सरचिटणीस मनोज पावशे तर शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले आहे.









