ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. आता पर्यंत 3 लाख पेक्षा अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अमेरिकेत ही संख्या प्रचंड आहे. आता भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून भारताचा आकडा एक लाख पार झाला आहे. मात्र, या लढाईमध्ये भारत अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. भारताने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक जगभरात होत आहे. त्याचा जाता भारतासाठी अभिमानास्पद बाब समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन त्यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. हर्षवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. 22 मे पासून ते पदभार स्वीकारणार असल्याची माहितीही मिळाली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांची जपान मधील डॉ. हिरोकी नकतानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या नकतानी हे 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झाले. 194 देशांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच तीन वर्षासाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समूहाने सर्वांच्या वतीने घेतला होता.