प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कृषीपूरक उत्पादनांसाठी स्वतंत्र क्लस्टर सुरू करावे, मुंबई बेंगळूर इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे कामाला अंतिम स्वरूप द्यावे व रत्नागिरी नागपूर महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रि अॅन्ड अॅग्रीक्लचर आणि वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रि, अॅग्रो अॅन्ड एज्युकेशन यांच्यावतीने मंत्री गडकरी यांच्याशी वेबकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद आयोजित केला. त्यामध्ये खासदार माने व ललित गांधी यांनी सहभाग घेतला. मंत्री गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक, जहाज बांधणी यांच्यासोबतच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) खात्याचा कार्यभार आहे.
ग्रामीण भागामध्ये उद्योग उभारण्यासाठी चालना देण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
शहरी-ग्रामीण विभागात संतुलित विकास साधण्यासाठी गाव, गरीब, कामगार, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी पूरक उत्पादनांच्या उद्योगाला चालना दिली पाहिजे. यासाठी कृषी पूरक उत्पादनांसाठी स्वतंत्र क्लस्टर सुरू मंजूर केल्यास, ग्रामीण भागात शेतीबरोबर औद्योगिक विकास साधता येईल. यातून शेतकरी उद्योगी बनेल व स्थानिक भूमीपूत्रांना रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. देशाच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या मुंबई बंगळूर इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे काम प्रलंबित आहे. इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे कामाला अंतिम स्वरूप देणे गरजेचे आहे. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरून नवीन गुंतवणूक होऊन, नवीन उद्योग सुरू होतील. यामुळे मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील तसेच स्थानिक उद्योगाला चालना मिळेल.
रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रलंबित आहे. या मार्गाचे चौपदरीकरण झाल्यास विदर्भ ते कोकण वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. यामुळे नागपूर थेट सागरी वाहतूकीला जोडला जाईल. त्यामुळे जलमार्ग वाहतूकीला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला.








