ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील बेस्ट सेवा देखील सुरू आहे. मात्र, या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोमवार पासून बेस्ट कामगार घरीच राहणार असा इशारा कामगार कृती समितीने दिला आहे.
आज पासून कामगारांनी कामावर येऊ नये, 100 टक्के लॉक डाऊन पाळावा असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे. तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विमा आणि वैद्यकीय सुरक्षा द्या या भूमिकेवर ते ठाम आहेत.
तर दुसरीकडे डॉक्टर, नर्स, पोलीस आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि इतर बससेवा नियमित कार्यरत ठेवणार असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक प्रवीण कुमार बागडे यांनी सांगितले आहे. तरी देखील कामगार समितीने मागण्या पूर्ण होईपर्यंत बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, आता पर्यंत 120 पेक्षा अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 8 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.









