वार्ताहर/देवराष्टे
मुंबई येथील शाहुनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने आज, शनिवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. या पोलीस अधिकाऱ्याचे मूळ गाव चिंचणी तालुका कडेगाव असून काही वर्षापूर्वी त्यांचे वडील नोकरी निमित्त शिराळा येथे गेल्याने त्यांचे कुटुंब शिराळा येथेच वास्तव्यास आहे.
तरुण आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या निधनामुळे त्यांच्या चिंचणी या गावी परिसरात तसेच पोलिस वर्तुळात हळहळ व्यक्त होतं आहे. कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता ११४० वर जाऊन पोहचला आहे. कोरोना या संसर्ग रोगाने आतापर्यंत आठ पोलिसांचे बळी घेतलेले आहे.
मागील अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यास ताप, सर्दी आणि खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी १३ मे रोजी कोरोनाची तपासणी केली होती. तपासणीत त्यांचा रिपोर्ट हा पाँझिटिव्ह आला. १६ मे रोजी कुलकर्णी हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार होते. दरम्यान आज पहाटे ५-वा. ते घराच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . धारावीत असलेले शाहू नगर पोलिस ठाण्याचा परिसर हा कोरोनाचा हाँटस्पाँट म्हणून ओळखला जात आहे. माञ अशा परिस्थितीतही ते २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. चिंचणी येथे त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र घरकुल पूर्ण होण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleसोलापुरात 150 जण झाले कोरोनामुक्त, 21 नव्या रुग्णांची भर
Next Article उपमुख्यमंत्र्यांनी घेतली परप्रांतियांची भेट








