रत्नागिरीत पोलिसांनी पकडले : शुक्रवारी दिले गोवा पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी / पेडणे
गोवा राज्यातून सध्या मोठय़ा संख्येने मजूर आपल्या गावी जाण्यासाठी संधी शोधत असून मिळेल त्या दिशेने महाराष्ट्रात, कर्नाटकात जात आहेत. असेच गोव्यातून रत्नागिरी येथे पोचलेल्या 80 कामगारांना महाराष्ट्र पोलिसांनी पत्रादेवी चेक नाक्मयावर आणून पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना जेथे ते भाडय़ाच्या घरात राहत होते त्या ठिकाणी सोडण्यात आले. मात्र क्वारंटाइन केले गेले नाही. त्यामुळे एखादा मजुराला कोरोना संसर्ग झाल्यास मोठी समस्या उद्भवू शकते.
कोलवाळ, म्हापसा व पेडणे या भागातून हे उत्तरप्रदेश व बिहार या राज्यांतील मजूर मिळेल त्या वाटेने महाराष्ट्र राज्यात गेले. चालत चालत रत्नागिरीत पोचले. तेथील पोलीस आणि सरकारी यंत्रणेने त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते गोव्यातून रत्नागिरी येथे पोहोचले असल्याचे समजले. अशा सुमारे 80 मजुरांना दि. 15 रोजी पोलिसांनी पत्रादेवी चेक नाक्मयावर आणून पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पेडणे पोलिसांनी त्यांची माहिती घेतली व त्यांना ते पूर्वी ज्याठिकाणी राहत होते त्या ठिकाणी पोचवण्यात आले.
पेडणे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे संपर्क साधला असता, मोठय़ा प्रमाणात या भागातील मजूर लॉकडाऊनमुळे भयभीत झाल्याने मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत असतात. उत्तर प्रदेश राज्याने पूर्णपणे लॉकडाऊन केल्याने कुणालाच प्रवेश दिला जात नाही. हे कामगारही आपल्या राज्यात जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा वापर करून गेले असावेत. असा अंदाज आहे. हे कामगार बेवारशी नाहीत. त्यांची भाडय़ाची घरे असतील जेथे ते पूर्वी राहत होते तेथे त्यांना पाठवण्यात येईल. ज्यांचे घर नाही त्यांना निवारा देण्याची सरकारने सोय केली असून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
लॉकडाऊन काळात राज्याच्या सर्व सीमा बंद झाल्या असल्या तरीही अनेक आडमार्गांचा वापर करून हे कामगार शेजारच्या राज्यात जात असत किंवा शेजारच्या राज्यातून गोवा राज्यात येतात. लॉकडाऊन काळात बाहेरील राज्यातून कुणीही आडमार्गाने आला तर त्याला शुल्क आकारुन क्वारंटाइन केले जाते.
त्या कामगारांची आरोग्य तपासणी करा : तळवणेकर
गोव्यातील जे 80 कामगार रत्नागिरीत पोचले व महाराष्ट्र पोलिसांना त्यांना पुन्हा पत्रादेवी येथे आणून सोडले त्यांचा वाटेत एखाद्या कोरोना रूग्णाशी संपर्क आला नसेल कशावरून, असा प्रश्न पेडणे काँग्रेस गटाध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी उपस्थित केला आहे. या कामगारांची आरोग्य चाचणी करायला हवी होती. सरकारने ती हाती घ्यावी अशी मागणी तळवणेकर यांनी केली आहे.









