प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या परिस्थितीत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने बीपीएल व अंत्योदय रेशनकार्डधारकांना मोफत रेशन वाटप सुरू आहे. मात्र यामध्ये स्थलांतरित आणि विविध कामांसाठी राज्यात आलेल्या परराज्यांतील मजुरांना याचा लाभ मिळत नव्हता. या नागरिकांची रेशनकार्डे संबंधित राज्यातील असल्याने येथील रेशन दुकानातून त्यांना आहारधान्याचा पुरवठा करण्यात येत नव्हता. मात्र वन नेशन वन रेशनअंतर्गत ही समस्या दूर झाली आहे. आता कोणत्याही राज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या रेशनकार्डवर हक्काचे रेशन घेता येणार आहे. यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेळगाव शहरासह जिल्हय़ात बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान यासह अन्य राज्यांतील नागरिक कामासाठी मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. विविध कामांवर या राज्यांतील मजूर कार्यरत आहेत. मात्र बऱयाच जणांकडे रेशनकार्ड नाही. काहींजवळ त्यांच्या राज्यातील रेशनकार्डे आहेत. परंतु अन्य राज्यांतील रेशनकार्डावर येथील रेशन दुकानातून त्यांना रेशनचा पुरवठा करण्याची मुभा नव्हती. यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या दोन महिन्यांपासून स्थलांतरित आणि अन्य राज्यांतील मजूर कुटुंबांची परिस्थिती हालाखीची बनली आहे. याची दखल घेण्यात आली असून केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशनअंतर्गत आता या कुटुंबीयांनाही रेशनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे परराज्यांतून बेळगावात कामासाठी आलेल्या असंख्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या नागरिकांना आता तांदूळ, गहू आणि डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे.









