प्रतिनिधी/ सातारा
दुकान वेळेत उघडले जात नाही.ग्राहकांशी उध्द्दट वर्तणूक केली जाते.कार्डवर जेवढे लोक आहेत त्यांचे रेशन दिले जात नाही, अशा अनेक तक्रारी सातत्याने नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत.त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित कुराडे,पुरवठा निरीक्षण अधिकारी
सुनील शेटे, पुरवठा निरीक्षक संतोष दळवी यांनी दुपारी अचानक दुकानास भेट देऊन कारवाईला सुरुवात केली.दुकानदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून सदरबझार परिसरात रेशन दुकानाच्या तक्रारी वाढल्या होत्या.मात्र, त्याकडे सामाजिकतेच्या भावनेतून दुर्लक्ष केले जात होते.लॉक डाऊनच्या काळात रेशनचे दुकान कधी उघडे तर कधी बंद असा कार्यक्रम सुरू होता.नागरिकांनी अनेकदा दुकानाच्या बाबत तक्रारी तहसील कार्यलयात केल्या.मात्र,तहसील कार्यलयातून काहीच ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानुसार आज दुपारी 12 वाजता पुरवठा विभागाचे पथक दाखल झाले.तपासणी सुरू होती.त्यामुळे दुकानमालकाचे धाबे दणाणले असून नागरिकांनी ही तक्रारींचा पाढा वाचला.कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे पथक नेमके काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.









