तळेरेहून पाठविले माघारी सावंतवाडीत
अनेक मजुरांची गावी जाण्यासाठी पायपीट
वार्ताहर / सावंतवाडी:
गोवा भागातून मोठय़ा प्रमाणात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश येथील परप्रांतीय कामगार पायी सिंधुदुर्गमार्गे आपापल्या गावी जाण्यासाठी निघत आहेत. आंबोली घाटमार्गे कोल्हापूरकडे पायी तर काहीजण ट्रकमधून निघत आहेत. असेच काही कामगार ट्रकमधून जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सावंतवाडी तहसील कार्यालयासमोरही शेकडो मजूर जमले होते.
आंबोली घाटमार्गे सुमारे 50 हून अधिक बिहार, उत्तरप्रदेशचे कामगार पायी जात होते. त्यांना सामाजिक कार्यकर्ते गणपत राऊत यांनी आर्थिक मदत केली. आम्हाला कोल्हापूर येथून रेल्वेने गावी जायचे आहे, असे ते सांगत होते. गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून आपल्या गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली. पण जायला वाहनाची सोय नाही. त्यामुळे सदर कामगार हतबल होऊन पायी निघाले आहेत. गोवा येथून मध्यप्रदेशचे कामगार पायी निघाले. बांदा येथे आले असता एक रिकामा ट्रक दिसताच ते ट्रकमधून कोल्हापूरकडे निघाले. तळेरे तपासणी नाका येथे पोलिसांनी त्यांना अडवत माघारी सावंतवाडीत पाठविले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, ट्रकचालकाला नाहक भुर्दंड सोसावा लागला.
परप्रांतीय कामगारांची तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कुडाळ येथे रेल्वेने जाण्याची सोय केली. मात्र, आंबोली घाटमार्गे जाणारे ते परप्रांतीय कामगार पायी कोल्हापूरकडे रवाना झाले.









