वाळपई येथील घटना : माजी आमदार नरहरी हळदणकर यांचा गोदाम
प्रतिनिधी / वाळपई
माजी उपसभापती तथा वाळपई मतदारसंघाचे माजी आमदार नरहरी हळदणकर यांच्या वाळपईतील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार घडून आगीमुळे एक कोटीपेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज आहे. घराच्या तळमजल्यावर साठवून ठेवलेला मद्याचा साठा याआगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुमारे 12 पाण्याच्या बंबांचा वापर करून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले.
आगीची ही दुर्घटना काल बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पहिल्या मजल्यावर त्यांचे कुटुंब तर दुसऱया मजल्यावर त्यांचे बंधू संतोष यांचे कुटुंब राहते. अचानकपणे तळमजल्यावर मद्याचा साठा करून ठेवलेल्या परिसरामध्ये स्फोट झाल्याच्या आवाजामुळे घबराट निर्माण झाली.
सध्या दारू गाळण्याचा मौसम असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात दारूचा साठा करुन ठेवण्यात आला होता. अचानकपणे गोदामात स्फोट झाल्यामुळे तिथे काम करणाऱया तीन मुली घाबरल्या. शेजारीच एका कामामध्ये व्यस्त असलेले माजी नगरसेवक शेख फैजल यांच्या कानावर स्फोटाचा आवाज पडल्यानंतर त्यांनी धाव घेतली. जवळपास भूकंप झाल्यासारखा आवाज आल्यामुळे परिसरातही मोठय़ा प्रमाणात भीती निर्माण झाल्याची माहिती नगरसेविका सेहझीन शेख यांनी दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. वाळपई अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी हजर झाली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला.
फोंडा, डिचोली, ओल्ड गोव्याहून आले बंब
वाळपई येथील गाडीमधून आणलेले पाणी आग विझविण्यासाठी कमी पडू लागल्यामुळे फोंडा, डिचोली तसेच ओल्ड गोवा भागातीलही गाडय़ा बोलविण्यात आल्या. या तीन गाडय़ांतून जवळपास बारा वेळा पाणी भरून आणल्यानंतर आग आटोक्मयात आणण्यास अग्निशामक दलाच्या यंत्रणेला यश आले. दारू द्रव्य हे आगवर्धक असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करूनही आग आटोक्मयात आणण्यास अग्निशामक दलाच्या यंत्रणेला बऱयाच प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागले. अग्निशामक दलाच्या यंत्रणेला नागरिकांच्या सहकार्यामुळे आग पूर्णपणे विझविण्यासाठी तीन तास प्रयत्न करावे लागले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझविण्यात आली. आगीची तीव्रता पाहून नागरिकांनी हळदणकर कुटुंबाला त्यांच्या घरातून हलवून शेजारील घरामध्ये ठेवले.
अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास दीड कोटीची मालमत्ता वाचविण्यात यश आले. पहिला व दुसरा मजला पूर्णपणे सुरक्षित राहिला असून घरातील काही वस्तूंचे नुकसान झाले असले तरी दीड कोटीची मालमत्ता वाचविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाळपईतील सर्वात मोठी घटना
हळदणकर यांच्या घराला आग लागण्याचा प्रकार या भागातील सर्वात मोठी घटना असल्याचे नागरिकांचे मत आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गाधस आगीचे निश्चित कारण समजू शकले नसल्याचे स्पष्ट केले.
नरहरी हळदणकर हे ‘काजूलाना’ फॅक्टरीचे मालक असून त्यांचा ब्रँड गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. काजूलानाला चांगल्या प्रकारची मागणी आहे. एक प्रामाणिक व्यवसायिक म्हणून हळदणकर यांची प्रतिमा आहे. या घटनेवर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली.









