प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत परराज्यात अडकलेले नागरिक आपल्या घरी परतत आहेत. पण परवानगी घेऊन विविध राज्यांतून येणाऱया नागरिकांना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. केवळ पाच राज्यांतून येणाऱया नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला होता. पण सोमवारी या आदेशात बदल करण्यात आला असून, गोवा वगळता अन्य राज्यांतून बेळगावात दाखल होणाऱया नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे.
परराज्यातून येणाऱया नागरिकांची नोंद करण्यासाठी सीपीएड ग्राऊंड येथे विशेष केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील व्यवहार आणि विविध आस्थापने, कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दि. 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले होते. पण लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना परवानगीनंतर स्वगृही जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अडकलेले नागरिक आपल्या राज्यात आणि घरी पोहोचण्यासाठी धावपळ करीत आहेत. पण सध्या सरकारी वाहन सुविधा आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली असल्याने केवळ खासगी वाहनाने येणाऱया आणि जाणाऱया नागरिकांना शासनाकडून परवानगी मिळत आहे. सध्या परराज्यांतून येणाऱया नागरिकांची संख्या वाढत आहे. बहुतांश नागरिक खासगी वाहनाने किंवा स्वत:च्या वाहनाद्वारे येत आहेत. पण महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली अशा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्य शासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. या पाच राज्यांतून येणाऱया नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सरकारी संस्थांमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. पाच राज्ये वगळता अन्य राज्यांतून येणाऱया नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, राज्य शासनाने या आदेशात बदल केला असून, केवळ गोवा वगळता देशभरातील अन्य राज्यांतून येणाऱया प्रत्येक नागरिकाला सरकारी संस्थेत 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. सोमवारी सायंकाळी शासनाने हा आदेश बजावला असून, आता विविध राज्यांतून येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला कंबर कसावी लागणार आहे









