चिपळुणातील प्रकार, मास्क न वापरणाऱयांचे प्रमाण अधिक
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱया शहरातील 97जणांवर नगर परिषदेच्या विशेष पथकाने दंडाची कारवाई केली आहे. या नियमाचे सर्वाधिक उल्लंघन मेडिकल व डॉक्टरांकडून होत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या पावणेदोन महिन्यापासून सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे सातत्याने लॉकडाऊन वाढवले जात आहे. असे असताना बाजारपेठेसह अन्य भागात कामानिमित्त तसेच विनाकारण फिरणारे नागरिक, दुचाकीस्वार व काही व्यावसायिक घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सध्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेने मास्क न वापरणाऱयांवर कारवाई सुरू केली आहे. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक बाळकृष्ण पाटील, अमित पाटील, सौरभ गारंडे, महेश जाधव, वसंत निवाते, प्रसाद देवरूखकर आदींचे पथक तयार करण्यात आले आहे.
हे पथक पोलिसांच्या मदतीने मास्क न वापरणारे नागरिक, दुचाकीस्वार, व्यापारी यांच्यावर कारवाई करीत आहे. ही कारवाई करताना ज्यांनी खऱया अर्थाने नियमांचे पालन करून इतरांना पालन करायला सांगण्याची जबाबदारी असलेल्या मेडिकल व काही डॉक्टरांकडूनच मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या 8 दिवसांत 97 जणांवर कारवाई करताना त्यांच्याकडून 48 हजार 500 रूपयांचा दंड या पथकाने वसूल केला आहे.
नियमांचे पालन करा: पाटील
या बाबत बोलताना कर निरीक्षक पाटील म्हणाले की, काही डॉक्टर व मेडिकल चालकांकडून मास्कचा वापर होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. कारण याच ठिकाणी नागरिकांची सर्वाधिक गर्दी दिसून येते. त्यामुळे सर्वानीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.









