गुहागरात दोन महिन्यानंतर कोरोनाची पुन्हा एन्ट्री
प्रतिनिधी/ गुहागर, दापोली
मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथून प्राप्त झालेल्या 16 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये दापोलीतील तिघांचा तर गुहागरातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुहारातील जामसूद येथे रविवारी मृत्यूमुखी पडलेल्या 56 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्हयात कोरोनाच्या तिसऱया बळीची नोंद झाली आहे. जिल्हय़ात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडलेल्या गुहागर तालुक्यात सुमारे दोन महिन्यांनी पुनर्प्रवेश केला आहे. नव्या रूग्णांमुळे दापोलीतील रूग्ण संख्या 8 वर पोहचली आहे, तर जिल्हय़ाने कोरोनाचे अर्धशतक पार केले असून रूग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे. हे पाचही जण मुंबईहूनच परतले होते.
लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या 56 वर्षीय प्रौढाला 8 मे रोजी पहाटे खासगी रूग्णवाहिकेने गुहागर तालुक्यातील जामसूद या मुळ गावी आणण्यात आले होते. मुंबईतून आल्याने त्याला होम क्वारंटाईन करून स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी आलेल्या अहवालावरून ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तीबरोबर मुंबईत काम करणाऱया मुळ पालशेत येथील 50 वर्षीय व्यक्ती केअरटेकर म्हणून आला होता. त्याचा अहवालही पॉझीटीव्ह आल्याने गुहागर तालुक्यात तब्बल 56 दिवसांनी कोरोना रूग्णांच्या यादीत समावेश झाला आहे.
8 मे रोजी हे दोघे गावात आल्यानंतर ग्रामकृतीदलामार्फत तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे लक्षणे दिसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात जाण्याची सूचना करण्यात आली. मात्र रूग्णाची स्थिती नाजूक असल्याने ग्रामीण रूग्णालयातच त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यानंतर त्यांना जामसुद येथेच वस्तीपासून थोडे बाजूला स्वतंत्र घरामध्येच क्वारंटाईन करण्यात आले होते.
रविवारी त्यांचा मृत्यू झाल्यातंतर खबरदारी म्हणून कारोनाबाधिताप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबात पत्नी व चार मुले असून ते सर्व दुसऱया स्वतंत्र घरात रहात होते. त्यांना भेटावयासही गेलेले नाहीत.
सरपंच, पोलीस पाटीलसह डॉक्टरनेही दिले स्वॅब तपासणी नमुने
या रूग्णाच्या मृत्यूनंतर तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्याने जामसुद गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाचे पथक जामसुद येथे दाखल झाले. रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 10 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यात खासगी वाहनावरील चालक, अंत्यसंस्कार उपस्थित 4 मुले, आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी, जामसुदचे सरपंच, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावड इत्यादींचा समावेश आहे. अहवाल येईपर्यंत या 10 जणांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. या 10जणांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 37जणांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जामसुद गावात 335 घरे असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यासाठी 14 पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये 2 आरोग्य कर्मचारी आहेत.
मृताच्या भावाच्या तपासणीसाठी मुंबईला संपर्क
कोरोनाबाधित मृताला जामसुदमध्ये रूग्णवाहिकेने आणताना भाऊही सोबत होता. त्याच रूग्णवाहिकेतून तो मुंबईला परतला. यामुळे भाऊ व त्याच्या पत्नीला संस्थात्मक क्वारंटाईन करून स्वॅब तपासणी करण्याची सूचना मुंबई प्रशासनाला करण्यात आली आहे.
3 किलोमिटरचा परिसर आयसोलेट
जामसुद गावातील मृतासोबत दुसऱयाचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्या घरापासून तीन किलोमिटरचा परिसर आयसोलेट केला गेला आहे. याठिकाणी पोलिसांनी कडक पहारा बसवला असून या रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचाही अधिक तपास केला जात आहे.
दापोलीत 3 नवे रूग्ण
दापोली तालुक्यातील कळकी, कोळबांद्रे व भोपण या तीन गावांमध्ये मुंबईतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या तीन रूगांमुळे तालुक्याची रूग्ण संख्या 8 झाली आहे.
हे सर्वजण मुंबईतून चालत येत असताना त्यांना अडवून शहरातील नवभारत छात्रालयात संस्थात्मक क्वारन्टाईन केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र संशयित रुग्णांची संख्या वाढल्याने स्वॅब घेतलेल्या संशयितांना त्यांच्या घरीच क्वारन्टाईन करण्यात आले होते. यातील तिघांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने मंगळवारी प्रशासनाची पुन्हा एकदा धावपळ उडाली
या तिघांनाही विद्यापीठ विलगीकरण लक्षात ठेवण्यात आले असून कोळबांद्रे, भोपण व कळकी या तीनही गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तीनही गावांच्या सीमा सील करून ही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. या तिघांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. नव्या तीन रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यामध्ये माटवण येथील महिलेचा मृत्यू झाला असून 7 जण उपचाराखाली आहेत.








