कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू असताना पावसाचे काउंटडाऊन सुरू होणे, हे शुभवर्तमानच म्हणायला हवे. नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे यंदा नियोजित वेळेआधीच म्हणजेच येत्या शनिवारपर्यंत अंदमान-निकोबार बेटावर आगमन होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. स्वाभाविकच यंदा देशाच्या अन्य भागांतही मोसमी पाऊस लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. हा नक्कीच भारतीयांसाकरिता आशेचा अंकुर म्हटला पाहिजे. आज अवघ्या जगाला कोरोनाने ग्रासले असून, भारतासारख्या देशातही या विषाणूने जाळे विणायला सुरुवात केली आहे. उद्योगधंद्यांवरील परिणाम, बेरोजगारी, ढासळते अर्थकारण अशा दुष्टचक्रात येथील समाजजीवन अडकले असून, सर्वत्र निराशेचे मळभ दाटल्याचे पहायला मिळते. अशा गडद अंधारात मेघराजाची चाहूल लागणे म्हणजे प्रकाशकिरणे दाटल्याचीच लक्षण होत. सर्वसाधारणपणे मान्सून 20 मेच्या आसपास अंदमानात दाखल होतो. त्यानंतर 10 दिवसांच्या प्रवासानंतर तो केरळात प्रवेशतो. सध्या अंदमानच्या आसपास मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने येत्या शनिवारपर्यंत मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, आणि निकोबार बेट व्यापण्याच्या मार्गावर आहे. त्याचा मार्ग निर्विघ्न राहिल्यास केरळ, कोकणातही तो लवकर सक्रिय होऊ शकेल. कृषी क्षेत्रासह एकूण भारतीय अर्थव्यवस्थेकरिताही हे पोषक म्हणता येईल. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी प्रामुख्याने पावसाचा मानतात. या कालावधीत 88 सेंटीमीटर इतका पाऊस देशभरात नोंदविण्यात येतो. आयएमडीने आपल्या दीर्घकालीन अंदाजात यंदा भारतात सरासरी म्हणजेच 100 टक्क्यांच्या आसपास पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. यात 5 टक्के कमी-जास्त प्रमाण धरले आले. मुख्य म्हणजे अवर्षणाची शक्यता केवळ 9 टक्के इतकी असल्याचे यासंदर्भातील रिपार्ट सांगतो. तर सर्वसाधारण 41 टक्के, सरासरीपेक्षा अधिक 21, अतिरिक्त 9 आणि सरासरीपेक्षा कमी 20 टक्के पाऊस अशा शक्याशक्यता गृहीत धरण्यात आल्या आहेत. यंदा दुष्काळाची छाया नाही, हेच यातून अधोरेखित होते. दुष्काळात तेरावा म्हणजे संकटात दुसरे संकट, अशा अर्थाची मराठीत म्हण आहे. किंबहुना आज सांप्रतच्या संकटात पाऊसमान चांगले राहण्याचा सांगावा म्हणजेच वाळवंटातील हिरवळच ठरावी. खरे तर मान्सूनचे वेळेआधी आगमन, त्याची सक्रियता व पावसाचे चांगले प्रमाण, हे भरभराटीचे व सुबत्तेचे लक्षण मानले जाते. भारतासारख्या देशातील 65 टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. केवळ शेतीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांकरिता पाऊस हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. नागरी जीवन असो वा उद्योगधंदे. पाण्याशिवाय पानही हलत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थव्यवस्थाही पाऊस परिणाम करतो. साहजिकच वरुणराजाची कृपा राहिल्यास घसरत्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात का होईना तरतरी मिळेल. तिला तग धरता येईल. मागच्या काही दिवसांत देशांतर्गत व राज्यांतर्गत मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. यातील बहुतांश मंडळी लवकर परतण्याच्या स्थितीत नाहीत. अनेकांची कमी अधिक प्रमाणात गावी शेतीभाती आहे. पारंपरिक शेती गावातील भाऊ कसतो किंवा अन्य कुणाला तरी कसण्यास दिली जाते, असे सर्वसाधारण चित्र आहे. तथापि, गावी परतलेले चाकरमानी बसून राहण्यापेक्षा शेतीकरिता हात पुढे करू शकतात. किमान स्वत:च्या गरजा तरी त्यातून भागवता येतील. तर काहींना नियोजनबद्ध चांगले उत्पादनही घेता येईल. अर्थात एका बाजूला हे सुगीचे दिवस आले, तरी शेतमालाचे काय, हा प्रश्न उरतोच. तसा या महामारीत शेतकरी सर्व बाजूने नाडला गेला. त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला असता, तर कोणतेही दु:ख वाटण्याचे कारण नव्हते. परंतु, शेतकऱयांकडून कवडीमोल दरात माल खरेदी करून तो दलाल वा व्यापाऱयांमार्फत चढय़ा दरात विकण्यात आला. त्यापेक्षा माल फेकून देणे काही शेतकऱयांनी पसंत केले. म्हणूनच आता तरी शेतकऱयांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल, थेट शेतकरी व ग्राहक अशी यंत्रणा कशी उभी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. महात्मा गांधी यांनी खेडय़ाकडे चला, असा संदेश देशवासियांना दिला होता. त्यातील मर्थितार्थ वा गांभीर्य समजून घेण्याऐवजी गांधी कसे तंत्रज्ञानविरोधी होते, हे पटवून देण्यासाठी येथील काही मंडळी खपत राहिली. विकासाच्या अतिहव्यासापोटी शहरांचे आपण अरक्षश: कुऱहाडे केले. मुंबई व इतर महानगरांची क्षमता काय, हे ध्यानात न घेता तेथे मेंढरासारखी माणसे कोंबली गेली. केंद्र असो वा राज्य. मुंबईसारख्या शहरांच्या जीवापेक्षा त्यांना येथील महसूलच महत्त्वाचा वाटला. आज या अतिरिक्त भारानेच विविध शहरांची व्यवस्था कोसळू पाहत आहे. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. वास्तविक, आज खेडय़ातील माणूस शहरातील माणसापेक्षा अधिक आनंदी वाटतो. कधी नव्हे, तो शहरवासियांना ग्रामजीवनाचा हेवा वाटतो आहे. शहरांमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंग वगैरेची उजळणी वा भाजीपाल्यासाठी झुंबड उडत असताना तिकडे गावात कुणी शेतात जाऊन राहतो. आपल्याच शेतात, परसबागेत लावलेल्या भाज्या आनंदाने काढताना दिसतो. गांधी म्हणायचे, ‘खेडी स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनायला हवीत. मूलभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण खेडी मुख्य प्रवाहाशी जोडल्यास खऱया अर्थाने देशाचा विकास होईल.’ मात्र, कृषी अर्थव्यवस्थेला आपण कायमच गृहीत धरले. म्हणूनच यापुढे विकासाचे विकेंद्रीकरण कसे होईल, गावे समृद्ध कशी होतील, वेगवेगळय़ा भागांत लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन लोकसंख्येची घनता कशी कमी होईल, यासाठी प्रयत्न हवेत. पाऊस हा समद्धीचे प्रतीक मानला जातो. या पावसातून बळीराजा पीक पिकवतो. त्यातूनच समाजाचे भरण पोषण होते. याचे विस्मरण होऊ नये. उद्योगधंद्यांबरोबरच शेती, शेतकरी, पर्यावरण यालाही प्रतिष्ठा मिळावी. दरवर्षी पाऊस हाच सांगावा घेऊन येत असावा. संकटातून धडा घ्यायचा असतो. म्हणूनच भविष्यात भौतिक विकासाच्या पलिकडे जाऊन निसर्ग, प्रदूषणमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली, शहर व ग्रामनियोजन यावर आपल्याला विशेष भर द्यावा लागेल.
Previous Articleसोलापूर : कोरोना रुग्णांमध्ये घट, आज नवे दोनच रुग्ण
Next Article वीज व्यवसायातील हिस्सा अनिल अंबानी विकणार ?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








