जिल्हय़ाबाहेरून आलेल्या 946 जणांना करण्यात आले क्वारंटाईन : बांदा तपासणी नाक्यावर अतिरिक्त काऊंटर
आणखी 58 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
आणखी 37 जणांचे नमुने तपासणीला पाठविले
सिंधुदुर्गात येण्यासाठी 18,854 व्यक्ती इच्छूक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणाऱया व्यक्तींची संख्या 946 वर पोहोचली आहे. मात्र सुदैवाने आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये 26 रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. तसेच बांदा तपासणी नाक्यावर तपासणीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने जिल्हाधिकाऱयांनी बांदा तपासणी नाक्याला भेट देऊन तपासणी जलदगतीने होण्यासाठी आणखी तपासणी काऊंटर उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तिसऱया लॉकडाऊनची मुदत 18 मेपर्यंत आहे. परंतु, मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ती मुदत वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात आता लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच मुंबई येथून येणाऱया व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. जिल्हय़ात आतापर्यंत आलेल्या एकूण 946 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये 632 व्यक्ती होम क्वारंटाईन, तर 314 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 802 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 765 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील चार अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 761 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी पाठविण्यात आलेले आणखी 58 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात 26 रुग्ण दाखल आहेत.
आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी 2591 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात आढळलेल्या कोरोना बाधित चारपैकी दोन रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. अन्य दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान राज्य शासनाच्या रिपोर्टमध्ये सिंधुदुर्गात कोरोना बाधित सहा रुग्ण दाखविले जात आहेत. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हय़ात चारच रुग्ण असून जे दोन अतिरिक्त रुग्ण दाखविले जात आहेत, ते मुंबई येथे असणारे. परंतु, त्यांचा मूळ रहिवासी पत्ता सिंधुदुर्गातील असल्यामुळे दोन रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले असून लवकरच त्याची दुरुस्ती होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
बांदा तपासणी नाक्मयाची जिल्हाधिकाऱयांनी केली पाहणी
बांदा तपासणी नाका येथे तपासणीसाठी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी बांदा तपासणी नाका येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोव्याचे प्रधान सचिव पुनित गोयल, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आर. मेनका, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसुन, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बांदा तपासणी नाक्मयावर वाहनांची तपासणी जलदगतीने होण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच तपासणी जलदगतीने होण्यासाठी आणखी तपासणी काऊंटर उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.
अन्य जिल्हय़ात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा जिल्हय़ात जाण्यासाठी 13 हजार 25 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्हय़ामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या-त्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.
राज्याबाहेर जाण्यासाठी 17130 व्यक्तींची नोंदणी
राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱयांना पाठविण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱया व्यक्तींनी त्यांच्या संबंधित राज्याच्या लिंकवर जाऊन नोंदणी करून पास प्राप्त करून घेण्याविषयी संबंधित राज्य शासनानी कळविले आहे. त्या बाबतच्या लिंकची माहिती संबंधित राज्यांनी जिल्हा प्रशासनास कळविली आहे. तसेच ही माहिती पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एस. एम. एस. च्या माध्यमातून कळविण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात येण्यासाठी 18,854 व्यक्ती इच्छूक
सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांमधून 18 हजार 864 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉस्पिटल व कंटेनमेंट झोनमधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ातील 11 कॅम्पमध्ये एकूण 215 कामगार व बेघर व्यक्ती वास्तव्यास आहेत. या सर्वांच्या निवासासोबतच भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
रेड झोनमधून येणाऱयांना संस्थात्मक क्वारंटाईन
सिंधुदुर्ग जिल्हय़ात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला असून मुंबईसह विविध रेडझोन भागातून येणाऱया प्रत्येक व्यक्तीला थेट घरी जाऊ न देता किंवा होम क्वारंटाईन न करता रेडझोनमधून येणाऱया प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून सर्व पोलीस, महसूल व आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. जिल्हय़ातील नागरिकांनी रेडझोनमधून येणाऱया व्यक्ती थेट घरी गेल्याचे समजल्यास जवळच्या आरोग्य, पोलीस किंवा महसूल यंत्रणेच्या अधिकाऱयांना कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
घरीच अलगीकरण 0632
संस्थात्मक अलगीकरण 0314
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0802
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0765
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0004
निगेटिव्ह आलेले नमुने 0761
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0037
विलगीकरण कक्षात दाखल 0026
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0002
सोमवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2591









