प्रतिनिधी बेळगाव :
वादळी वारा व अवेळी पावसाने शेतवडीतील एका शेडची भिंत कोसळून बकरी चारण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कल्लाप्पा सिद्धाप्पा सांबरेकर (वय 40) रा. कोंडसकोप्प व त्याचा भाचा परशुराम गंगाप्पा शहापूरकर (वय 14) रा. शिंदोळी अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मामा-भाच्याची नावे आहेत. के. के. कोप्पजवळील वारी शेतवाडीत ही घटना घडली असून घटनास्थळी परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती.
के. के. कोप्प, हलगा-बस्तवाड, कोंडसकोप्प परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हिरेबागेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नागराज अंबिगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.