गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 199.32 अंकांनी चढून 31642.70 वर बंद झाला तर निफ्टी 52.45 अंकांनी चढून 9251.50 वर बंद झाला. अर्थात ही तेजी प्रेरणादायी आजिबात नाही. आगामी काळातील शेअरबाजारांची वाटचाल मंदीच्या दिशेनेच होणार हे निश्चित आहे. कोरोना विषाणूमुळे आलेली जागतिक मंदी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच सध्या तरी ज्या वेळी शेअर बाजारांत तेजी येईल त्यावेळी विक्री करून फायदा मिळवणे हाच पर्याय दिसतो आहे.
गेल्या आठवडय़ाच्या सुरूवातीला शेअर बाजारांची सुरूवात तर अगदी मंद झाली होती. पण नंतरच्या सत्रांत खालच्या स्तरांवर खरेदी होताना दिसून आली आणि त्यामुळे शेअर बाजारांत काही प्रमाणात तेजीचे वातावरण दिसले. भारतीय बाजारांत अर्थातच जागतिक परिस्थितीचे प्रतिबिंब पडते आहे. शेअर बाजारांत मंदीचा कल दिसत असला तरी अस्थिरता हळूहळू कमी होत चालली आहे, हे महत्वाचे आहे.
कोरोनाचे संकट दूर झाले नसले तरी विविध कंपन्या आता आपल्या कामाला सुरूवात करतील आणि त्यांना त्यांचे बॅलन्सशीट मजबूत करण्यासाठी पैशाची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने बडय़ा कंपन्यांनी हालचालीही सुरूवात केली आहे. जीएसके, रिलायन्स इंडस्ट्रीजने काही हजार कोटी रूपयांचे शेअर्स विकून पैसा उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारनेही नोंदणीकृत कंपन्यांतील जवळजवळ 22 हजार कोटी रूपयांचे शेअर्स विकण्याचा विचार सुरू केला आहे.
या सगळय़ाचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होईल अशी भीती व्यक्त होत आहे. शेअर्सच्या किमती आणखी घसरतील. पण हे घसरणे एकदम असणार नाही. म्हणजे एकदम तळ गाठला असे होणार नाही तर हे हळूहळू होईल. सध्याच्या काळात सगळय़ांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. शेअर बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर हा संयम अत्यंत महत्वाचा आहे आणि गुंतवणूकही तितकीच महत्वाची आहे. सध्याच्या काळात संयम बाळगूनच गुंतवणुकीकडे पहायला हवे. विशिष्ट स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करून गुंतवणूक करा, पण स्टॉक्सच्या घसरलेल्या किंमतींनी गलितगात्रही होऊ नका.
लॉकडाऊनमुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होणार आहे. आणि उद्योग, व्यापार यावरही परिणाम होणार आहे. या परिस्थितीत शेअर बाजारांची स्थिती तेजीची राहील अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. एक तर तुम्ही दीर्घकालीन उद्दीष्ट ठेवून गुंतवणूक करायला हवी किंवा तेवढा संयम बाळगणे कठीण जात असेल तर जेव्हा जेव्हा बाजार तेजीचा कल दर्शवतात तेव्हा तेव्हा विक्री करून बाहेर पडणे हे जास्त हितावह ठरेल.
सध्याच्या एकूणच गोंधळाच्या वातावरणातही रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली पताका फडकावत ठेवली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजारांतील आशा जिवंत ठेवली आहे असे म्हणायला हरकत नाही.
येत्या आठवडय़ातही अर्थव्यवस्थेवरील अनिश्चतितेचे सावट अद्याप उठलेले नाही. त्यामुळे बाजारांत फार मोठी हालचाल होईल अशी अपेक्षा नाही. कोरोना संक्रमित क्षेत्रांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन पाडण्यात आले आहेत. ग्रीन झोनमधील व्यवहार सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ऑरेंज झोनमध्येही खूप सावधगिरी बाळगून व्यवहार सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर जर विविध उद्योग जर सुरू झाले आणि व्यवहार होऊ लागले तर अर्थव्यवस्थेवरील ताण कमी व्हायला लागेल. सध्याच्या दीड दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व आर्थिक उलाढाल जवळजवळ ठप्प होती. पण जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार आणि पुरवठा सुरूच होता. म्हणजे अर्थव्यवस्था अगदीच ठप्प झाली आहे असे नाही. आगामी काळात लोकांच्या क्रयशक्तीवर भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून धावेल की घसरेल हे अवलंबून असणार आहे.
सोमवारी आयसीआयसीआय बँकेची आकडेवारी जाहीर होणार आहे त्यावरही बाजाराची प्रतिक्रिया येईल. पण एकूणच बाजाराचा कल नकारात्मक असणार आहे हे नक्की.
कोरोना रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ, लॉकडाऊन वाढण्याची आशंका, सरकार उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी सरकार आणखी पॅकेज जाहीर करते का, मार्च अखेर संपलेल्या तिमाहीची आकडेवारी, अमेरिका-चीन यांच्यातील संघर्ष, तेलाच्या किमती, उत्पादनाची आकडेवारी आणि महागाई निर्देशांक अशा विविध घटकांवर पुढील आठवडय़ात आणि काळातही शेअर बाजारांची चाल अवलंबून असणार आहे. गेल्या आठवडय़ात 6.2 टक्कांनी निर्देशांकात घट झाली आहे.
सध्या चर्चेत असलेले स्टॉक्स आहेत आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनआयआयटी टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, पर्सिस्टंट सिस्टम्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एयू स्मॉल फायनान्स बँक, हेक्सावेअर टेक, बँक ऑफ बडोदा आणि ऍक्सीस बँक.
– संदीप पाटील, शेअरबाजार अभ्यासक