प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विनाकारण फिरणारी वाहने, चहा टपऱ्या, वडा-पाव विक्री सेंटर व गाड्या, आईस्क्रिम दुकाने, चारचाकी वाहनातून तीनपेक्षा जास्त जणांची वाहतूक, दुचाकीवरून दोघे-दोघे बेकायदेशीरपणे प्रवास करत आहेत. या धोकादायक हालचाली आहेत. त्या तत्काळ बंद कराव्यात, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिल्या आहेत. दरम्यान, गर्दी कमी होत नसेल किंवा नियमांचे पालन होत नसेल, तर जिल्ह्यात पुन्हा पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा त्यांनी आज दिला. देसाई म्हणाले, जिल्ह्यात शिथिलता दिली आहे.
लोक याचा गैरफायदा घेत आहेत. जिल्ह्यासह प्रत्येक शहराच्या ठिकाणी चहा टपऱ्या, हातगाड्या सुरू झाल्या आहेत. आईस्क्रिम आणि कोल्ड्रींग हाऊसही अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. हे चित्र जिल्ह्यासाठी धोकादायक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढू नये, यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बाहेरही लोक येत आहेत. त्यांनाही ज्या-त्या ठिकाणी 14 दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत.”
चौका-चौकात बंदोबस्त वाढवा
जिल्ह्यातील प्रत्येक चौकातील पूर्वीप्रमाणे बंदोबस्त वाढवावा. दुचाकी, चारचाकी वाहनातून नियमबाह्य होणारी वाहतूक थांबवली पाहिजे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्या आहेत. लॉकडाउन शिथिलचा लोक गैरफायदा घेत आहेत. मास्क वापरला जात नाही. चौका-चौकात लोक थांबत आहेत. राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही परिस्थिती कोल्हापुरात येऊ नये, यासाठी काळजी घेणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.








