प्रतिनिधी / फोंडा :
प्रवासी बसेस सुरु झाल्या तरी त्या वेळेत मिळत नाहीत. कामावर नाही गेलो तर पगार मिळण्याची शाश्वती नाही. शिवाय कामावरून काढून टाकण्याची भिती, अशा विवंचनेत सापडलेला सर्वसामान्य कामगारवर्ग लॉकडाऊन शिथील केल्याने घराबाहेर पडला आहे. पण आता त्याने धसका घेतला आहे, तो रस्त्यावर थांबून विनाहेल्मेटसाठी तालांव देणाऱया पोलिसांचा.
फोंडा शहरातील विविध नाक्यांवर थांबणारे पोलीस आंता दुचाकीचालकांबरोबरच मागे बसणाऱया व्यक्तीला हेल्मेट सक्तीचे असल्याच्या नियमावर अडून बसले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये अशा काही दुचाकीचालकांना तांलाव तर काहींना समज देण्यात आला आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पोलिसांच्या या जबरी तालांवामुळे कामावर जाणे कठिण बनले आहे. दुचाकीवरील दोन्ही स्वारांना हेल्मेट कायद्याने लागू आहे. मात्र लॉकडाऊनसारख्या अडचणीच्या व आणीबाणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर या नियमाची कितपत सक्ती लादायची याचे भान असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
सर्वसामान्य कामगारांना कामावर जाण्यात अडचण
फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला व पुरुष कुंडई, बेतोडा, मडकई व इतर औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जातात. याशिवाय फोंडा शहरातील विविध खासगी आस्थापने, कपडय़ाची दुकाने, गोवा बागायतदार किंवा अन्य आस्थापनामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करून उदरनिर्वाह चालवणाऱयांची संख्याही मोठी आहे. अशा लोकांनी लॉकडाऊनचा साधारण दीड महिना घरात बसून काढला. अजून लॉकडाऊन कितीकाळ वाढणार याची शाश्वती नाही. घरात बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार नाही, या चिंतेने ग्रासलेले अनेक कुटुंब प्रमुख आता कामानिमित्त घराबाहेर पडू लागले आहेत. यापैकी बऱयाच जणांकडे स्वत:ची दुचाकी नाही. त्यांचा नियमित प्रवास हा बस वाहतुकीवरच अवलंबून आहे. सध्या बस वाहतूक सुरु असली तरी फोंडय़ातील ग्रामीण भागातून शहराकडे येण्यासाठी बसेस सुरु झालेल्या नाहीत. काही भागात सुरु झाल्या तरी त्या वेळेत मिळत नाहीत. अशा परिस्थितीत या कामगारांना दुचाकी असलेल्या आपल्या शेजाऱयाकडे किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे लिफ्ट मागून कामावर जावे लागते. शिवाय संचारबंदीमुळे सायंकाळी ‘सातच्या आत घरात’ पोचण्याची घाई असते. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी हेल्मेट न घातल्यास वाटेत थांबणारे पोलीस दंड ठोठावत असल्याने आता त्यांना कुणी लिफ्टही देऊ पाहत नाही. अशावेळी कामावर जायचे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी कसा चालवायचा या विवंचनेत सर्वसामान्य नागरिक सापडला आहे.









