विविध राष्ट्रीय चॅम्पियनशिप्स भरविण्यासाठी विविध खाते, अकादमींना प्रथमच आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 या वर्षातील पुनर्रचित राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप्स आयोजित करण्यास इच्छुक असणाऱया राज्य संघटना, खाते, संस्था, अकादमी यांना निमंत्रित पेले असून आपली भूमिका 11 मेपर्यंत कळविण्याचे आवाहन हॉकी इंडियाने केले आहे.
यावेळी पहिल्यांदाच विविध खाते व अकादमींना राष्ट्रीय स्पर्धा आयोजनांसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. वरिष्ठ व कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप मात्र फक्त राज्य संघटनांनाच आयोजित करता येणार आहे. या स्पर्धा आयोजनास उत्सुक असणाऱयांनी आपली भूमिका 5 जूनपर्यंत स्पष्ट करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. अकादमीना फक्त उपकनिष्ठ व कनिष्ठ आंतरअकादमी राष्ट्रीय चॅम्पियनशिप आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनाही 5 जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
‘वरिष्ठ पुरुष व महिलांची स्पर्धा भरविण्यासाठी 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 तर कनिष्ठ-उपकनिष्ठ पुरुष व महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेसाठी 15 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2021 हा कालावधी देण्यात आला आहे. स्पर्धेचा यजमान निश्चित झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्याच्या निश्चित तारखा हॉकी इंडिया नंतर जाहीर करेल,’ असे हॉकी इंडियाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. ‘पुढील वर्षापासून वार्षिक राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धांची पुनर्रचना करण्यात आली असल्याने त्याबद्दलची उत्सुकता वाढीस लागण्याची अपेक्षा आहे,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले.









