अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार निवड प्रक्रियेस क्रीडा मंत्रालयाकडून प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इच्छुक असणाऱयांनी ई मेलद्वारे नामांकन पाठविण्याचे आवाहन क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी केले आहे. कोरोना व्हायरस महामारीला आवर घालण्याच्या हेतूने देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने मंत्रालयाने ही सूचना करीत त्यांनी प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसह अन्य क्रीडा पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
प्रतिवर्षी ही प्रक्रिया एप्रिलपासून सुरू करण्यात येते. पण यावेळी लॉकडाऊन असल्याने त्याला उशिराने सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊन सध्या तिसऱया टप्प्यामध्ये असून 17 मे रोजी त्याची समाप्ती होणार आहे. ‘कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याने इच्छुक क्रीडापटूंनी नामांकनाची छापील प्रत पाठविण्याची गरज नाही. अर्जदाराची व शिफारस करणाऱया संबंधित पदाधिकाऱयांची स्वाक्षरी असलेल्या अर्जाची स्कॅन केलेली प्रत अंतिम मुदतीआधी संबंधित विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे,’ असे मंत्रालयाच्या निवेदनपत्रात नमूद करण्यात आले आहे. नामांकन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 3 जून निश्चित करण्यात आली आहे. ‘अंतिम मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसून अर्ज पोहोचण्यास विलंब झाल्यास क्रीडा मंत्रालय त्याला जबाबदार राहणार नाही,’ असेही त्यात म्हटले आहे.
विविध क्रीडा प्रकारांतील क्रीडापटूंना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. निवड झालेल्या क्रीडापटूंना अर्जुन व खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यातील खेलरत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे. प्रशिक्षणात सर्वोत्तम योगदान देणाऱया प्रशिक्षकांना द्रोणाचार्य तर खेळातील आजीवन योगदानाबद्दल ध्यान चंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीच्या अर्जुन व खेलरत्न पुरस्कारांसाठी जानेवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीतील क्रीडापटूंची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. नेहमीच्या नियमानुसार डोपिंगचे आरोप असलेल्या क्रीडापटूंचा या पुरस्कारांसाठी विचार केला जाणार नाही.
‘ज्यांच्यावर डोपिंगप्रकरणी कारवाई झाली आहे किंवा चौकशी सुरू आहे, अशा खेळाडूंना या पुरस्कारांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे,’ असे मंत्रालयाने स्पष्ट केले. खेलरत्न मिळणाऱया क्रीडापटूला 7.5 लाख रुपये तर अर्जुन पुरस्कार विजेत्यास 5 लाख रुपये दिले जातात.
गेल्या वर्षी पॅरालिम्पियन दीपा मलिक व आंतरराष्ट्रीय मल्ल बजरंग पुनिया यांना खेलरत्न पुरस्कार विभागून देण्यात आला होता.









