24 तासांमध्येनवे 3900 रुग्ण, 195 जणांचामृत्यू,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात गत 24 तासांमध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले. तब्बल 3900 नवे रुग्ण आढळले असून या 24 तासात 195 जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 20 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 12 हजार 726 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा टक्का हा 27.41 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, देशभरात लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचा निर्णय घेतला असला तरी सर्व निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. सर्व राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केले.
रुग्णसंख्या 12 दिवसांनी दुप्पट
देशभरातील रुग्णसंख्या आता 12 दिवसांनी दुप्पट होत आहे, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. 12 हजार 726 जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा टक्का 27.41 इतका आहे, असेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
विदेशातील नागरिकांना उद्यापासून परत आणणार
विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया 7 मेपासून सुरू होईल. यासाठी खासगी विमान सेवेचा वापर केला जाईल. संबंधित नागरिक भारतात परतल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन केले जातील. तसेच त्यांना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य असेल. या संपूर्ण प्रक्रियेबाबत नागरी उड्डायण मंत्रालय सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. भारतीय रेल्वेने आतापर्यंत 65 एक्स्प्रेसमधून परराज्यात अडकलेल्या 70 हजारहून अधिक कामगारांना त्यांच्या गावी सोडले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यालयातील कामकाजासाठी नियमावली
कार्यालयीन कामकाजात सहभागी होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱयांना मास्कचा वापर अनिवार्य आहे. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या तापमानाची थर्मलने तपासणी करावी. सर्व कर्मचाऱयांना आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करणे सक्तीचे आहे. त्यांना सॅनिटायझरसह हँडवॉश उपलब्ध करुन देण्यात यावा. दुपारच्या जेवणावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळांमध्ये बदल करावा, अशी नियमावली असून याची सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांनी अंमलबजावणी कारावी, असे आवाहन
श्रीवास्तव यांनी केले.









