वार्ताहर / देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील मुंबईस्थित दोन महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
तालुक्यातील अन्य दुकाने सुरु व्हावीत यासाठी व्यापारी बंधुंनी देवरुखच्या तहसिल कार्यालयात जावून तहसिलदार सुहास थोरात यांची भेट घेतली. परंतू तालुक्यात लागोपाठ सापडलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र सिंगल दुकान असेल तर त्याला परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहिती तहसिलदार सुहास थोरात यांनी दिली आहे. मात्र बहुतांश दुकाने ही जोडून असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी त्यांना अदयाप परवानगी देण्यात आलेली नाही. व्यापाऱयांनी दुकाने उघडण्यास परवानगी मागितली असून जिल्हाधिऱयांनी परवानगी दिल्यास व्यापाऱयांना दुकाने सुरु करता येणार आहेत. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी मागण्यात आली आहे.
3 मे ही लॉकडाऊनची तारीख होती. त्यानंतर राज्यातील मोठया शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे लॉकडाऊनची तारीख 17 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. मुंबईतून आलेल्या दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तालुकावासियांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असल्यामुळे बाजारात गर्दी नव्हती. मात्र अनेक वाहन चालक सकाळच्या सत्रात बाजार परिसरात चकारा मारताना दिसून आल्यामुळे पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अनेकांवर कडक कारवाई करण्यात आली.
प्रतिक्रीया -सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते
व्यापाऱयांनी थोडा संयम ठेवावा, दुकाने उघडण्याची घाई करु नये. जीवापेक्षा व्यापार महत्वाचा नाही.









