प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव ‘ऑरेंज झोन’मध्ये की ‘रेड झोन’मध्ये’ आहे, हेच समजणे कठीण झाले आहे. जर ऑरेंज झोनमध्ये असेल तर सर्व आर्थिक व्यवहारांना पोलिसांनी बंदी का घातली. त्याचवेळी दारू दुकानांना मुक्त परवानगी कशी मिळाली? बाजारपेठ खुली का बंद, अशा विविध संभ्रमांमध्ये बेळगावची जनता अडकली आहे. दुर्दैवाने प्रशासन नेमके कोणतेही स्पष्टीकरण देत नसल्याने संभ्रमात अधिक भर पडली आहे. बाजारपेठ खुली होणार आहे, असे समजताच प्रत्येकजण बाजारपेठेत जाण्यासाठी घाई करू लागल्याने शहरात गर्दी वाढू लागली आहे.
काही प्रतिबंधित भाग वगळून बेळगाव जिल्हय़ाचा समावेश ‘ऑरेंज झोन’मध्ये करण्यात आला आहे. ‘ऑरेंज झोन’मध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत व्यवहार खुले राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु सोमवारी सकाळी जेव्हा दुकाने उघडली तेव्हा पोलिसांनी आपला खाक्मया दाखवत ती सक्तीने बंद करायला लावली. मात्र सर्व दारू दुकानांना पोलिसांनी खुले सोडले आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱया व्यापाऱयांना मात्र सक्तीने व्यवहार बंद करायला लावले. त्यामुळे बाजारपेठा सुरू की बंद असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
ऑरेंज झोनमध्ये शेतीची अवजारे विक्री करणाऱया दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. जी स्वतंत्र दुकाने आहेत ती उघडी राहू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु सोमवारी सकाळी रविवारपेठेतील काही दुकाने उघडल्यानंतर पोलिसांनी ती सक्तीने बंद केली. सकाळी रविवारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. मात्र काही दुकाने अर्धवट अवस्थेत उघडलेली दिसली. पोलिसांनी आम्हाला व्यवहार करायचे नाही, असे सांगितल्याने आम्ही दुकाने बंद करत आहोत, असे व्यापाऱयांनी सांगितले.
दरम्यान, बेळगावमधून कोरोना पूर्णपणे हटला आहे अशा भ्रमात नागरिकांनी शहर परिसरात आपला वावर सुरू केला आहे. नियम शिथिल केल्यानंतर कोरोना गेलाच असे समजून गर्दी करणाऱया नागरिकांना सामाजिक अंतराचा पूर्ण विसर पडला आहे. रविवारपेठेसह बाजारपेठेत हेच चित्र दिसून आल्याने सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला.
गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती
शेतीची अवजारे आणि बी-बियाणे विक्रीस परवानगी असल्याने बाजारपेठेत या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. कलमठ रोडवरील अनेक दुकाने उघडलेली दिसली. एकीकडे दुकान उघडल्यास व्यवसाय सुरू राहील असे वाटते, पण त्याचवेळी गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने शक्मयतो लॉकडाऊनच झालेले बरे. मात्र त्यासाठी सर्व व्यापाऱयांची एकजूट होणे आवश्यक आहे, असे मत यशवंत हार्डवेअरचे संचालक विश्वजीत उपाध्ये यांनी व्यक्त केले.
दरम्यान वस्त्रप्रावरणे, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स यासह अन्य दुकाने सोमवारी बंदच राहिली. काही दुकाने पोलिसांनी सक्तीने बंद केली तरी काही दुकानदारांनी गर्दी होईल आणि पुन्हा संसर्गाचा धोका वाढेल हा विचार करून आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले.
नागरिकांना नियमांचा विसर
एकूणच शहरात फेरफटका मारता सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर याचा पूर्णपणे नागरिकांना विसर पडला आहे. लॉकडाऊनचा अर्थच समजला नाही की काय, असे चित्र सोमवारी शहरात दिसले. सॅनिटायझर तर नव्हतेच, सामाजिक अंतराचे भान पूर्णपणे विसरले गेले होते. अनेक जणांनी मास्क वापरलेच नव्हते. त्यामुळे बेळगावला कोरोनाचा धोका नाहीच अशा भ्रमात हे लोक वावरत असल्याने पोलिसांसमोर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.









