महिनाभरापूर्वी काकती येथे घडली होती घटना
प्रतिनिधी / बेळगाव
कौटुंबिक वादातून पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. एक महिन्यापूर्वी खुनाचा हा प्रकार घडला होता. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात भादंवि 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
नागय्या अण्णय्या मेटी (वय 42), मूळचा राहणार कुळगेरी क्रॉस, ता. बदामी, जि. बागलकोट, सध्या राहणार काकती असे त्याचे नाव आहे. 6 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. नागय्याने पत्नी इरम्माचा (वय 35) खून केला होता.
दि. 5 एप्रिलच्या रात्री 10 पासून 6 एप्रिलच्या रात्री 8 या वेळेत नागय्याने ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केला होता. खुनानंतर दरवाजा बंद करून तो फरारी झाला होता. काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी त्याला अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.









