खासदार, आजी-माजी आमदारांसह पदाधिकारी, पोलीस, प्रशासनाची उपस्थिती: लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत बोलावलेल्या बैठकीवेळी सोशल डिस्टंन्सिंगचा पुर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये खासदार, आमदार, माजी आमदार, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारीही उपस्थित होते. यामुळे दोन महिन्यांपासून नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंगचे धडे देणारी हीच काय ती इचलकरंजी नगरपालिका असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरणसाठी उपाययोजना करण्याबाबत पालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शहरातील एनजीओना बोलावण्यात आले होते. यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी दीपक पाटील, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान या ठिकाणी पालिकेसह शहरातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली, आणि पालिकेचे सभागृह खचाखच भरून गेले. सुरवातील अंतर राखून ठेवलेल्या खुर्च्या जवळ घेत प्रत्येकाने ठिय्या मारला. त्याचबरोबर अनेक विषयांवर जवळ जात जोरदार चर्चा करण्यात आली. समोर बसलेल्या पदाधिकार्यांची संख्या वाढू लागल्याने खुर्च्यांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे या सर्वांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रश्नच उरला नाही. याबाबत प्रांताधिकारी व अपर पोलीस अधिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पण बैठकव्यवस्थेमध्ये बदल अथवा अनावश्यक गर्दी हटवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. याच अवस्थेत सुमारे अडीच तास चर्चा सुरू होती.
दरम्यान इचलकरंजीचा एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त बैठकीत येवून धडकताच सर्वांनीच बैठक आटोपती घेण्याचा पवित्रा घेतला. पण या प्रकारामुळे महिनाभर लोकांना सोशल डिस्टंन्सिंगचे धडे देणार्या पालिका व प्रशासनाची अवस्था मात्र लोका सांगे ब्रम्हज्ञान अशी झाल्याचे दिसून आले.
सांगलीला जमते मग इचलकरंजीला का नाही ?
सांगली महानगरपालिकेमध्येही सोमवार ४ रोजी बैठक पार पडली. ही बैठक पुर्णपणे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच उद्भवला नाही. पण सुमारे ३ लाख लोकसंख्या व ३५० कोटी बजेट असणाऱ्या इचलकरंजी पालिकेला मात्र अशा बैठकी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे का घेता येत नाहीत, हे एक कोडेच आहे.