प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन महिन्यांपासून उत्पन्नाचा स्तोत्र हिरावलेल्या व्यवसायिक नाटय़ कलाकारांनी आज रविवारी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. व्यवसायिक नाटय़ क्षेत्रात वावरणाऱया कलाचेतना वळवई, वरदहस्त क्रियेशन्स वाळपई, खामिणी कलामाची सावई वेरें, अश्वमेघ मीडिया पंचवाडी आणि नागेश महारुद्र,नागेशी बांदोडा या संस्थांंच्या प्रतिनिधींनी मंत्री गोविंद गावडे यांची भेट घेऊन त्यांना व्यवसायिक कलाकारांना आर्थिक आधार देण्याची तसेच त्यांना सरकारी किंवा निमसरकारी कामात सामावून घेण्याची मागणी केली.
मंत्री गोविंद गावडे यांना दिलेल्या निवेदनावर राज्य भरातील सुमारे 130 कलाकारांच्या सह्या असून हे सर्व कलाकार पूर्णपणे व्यवसायिक नाटकांवर अवलंबून आहेत. त्यात रंगमंचावरील कलाकार, वाहनचालक, प्रकाशयोजना, ध्वनियोजना, रंगमंच उभारणी व पडद्यामागील अन्य कलाकार असे विविध घटक असून त्यांना नाटय़कलेशिवाय उत्पन्नाचे अन्य साधन नाही. सरकारने या कलाकारांना आर्थिक मदत द्यावी किंवा त्यांना विविध सरकारी किंवा निमसरकारी कामात सामावून घ्यायचे जेणेकरून त्यांना उपजीविकेचे साधन प्राप्त होईल अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मंत्री गोविंद गावडे यांनी सदर निवेदन स्वीकारून त्यावर साकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सदर संस्थांंच्या प्रतिनिधींना दिले. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत बनल्याने आर्थिक आधार देण्याबाबत विचार करण्याची गरज असून अन्य पर्यायांचा विचार करू असे मंत्री गोविंद गावडे यांनी सदर शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान , मंत्री गोविंद गावडे यांनी राज्यातील उत्सवी तसेच हौशी नाटय़ कलाकारांचा प्रश्न उपस्थित केला असता या शि÷मंडळाने त्यांना केवळ नाटय़कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगितले. उत्सवी तसेच हौशी नाटय़ कलाकार व्यवसायिक कलाकारां प्रमाणे नाटय़ कलेवर अवलंबून नाही. त्यासाठी सदर निवेदन केवळ व्यवसायिक क्लाकरांतर्फे देण्यात आले असून सरकारने या कलाकारांच्या मागणीवर गांंभिर्याने विचार करण्याची मागणी शि शिष्टमंडळाने केली.









