मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून चाकरमान्यांना आणण्याच्या हालचाली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचे संकट बळावतेय…मुंबई, पुणे शहरात असलेल्या येथील चाकरमान्यांची चिंतेने मोठी घालमेल वाढतेय…त्यांना 4 भिंतीच्या आत राहणं खूप कठीण होऊन बनलेय…म्हणूनच या चाकरमान्यांना सुरक्षित व खबरदारी घेत गावाकडे आणण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी बेत सुरू झाले आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्य़ात कोरोनामुक्तीकडे वाटचाल झालेली असताना सुटकेचा निःश्वास टाकणाऱया रत्नागिरीकरांच्या मनात नव्याने 2 पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण सापडल्याने धस्स झालेय. चाकरमानी आगमन सुखावह असले तरी तितकी धास्तीही आता सतावू लागली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे आदी परजिल्हय़ात नोकरी, व्यवसायानिमित्त राहणाऱया रत्नागिरीकर चाकरमान्यांची संख्या काही लाखांत आहे. हे चाकरमानी गणपती, शिमगा, मे महिन्यात सुट्टय़ा घेऊन प्रामुख्याने मोठय़ा संख्येने गावाकडे दाखल होत असतात. पण यावर्षी कोरोनाने त्यावर पाणी फेरले आहे. लॉकडाऊनमुळे या शहरात सातत्याने नोकरी-व्यवसायाच्या मागे पळणारे सारे चाकरमानी चार भिंतीच्या आत घरात बंद झाले आहेत. त्यामुळे या साऱयांचे जगणे असहय़ बनले आहे. याला कारण त्या शहरातील कोरोनाची गंभीर स्थिती बनलेली आहे. याचा परिणाम चाकरमान्यांच्या परतीच्या मार्गावर बंधने आली आहेत.
आज 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम आहे. अशावेळी मुंबई, पुणे आदी ठिकाणी अडकलेल्या चाकरमान्यांना त्या शहरातून बाहेर काढून गावाकडे आणण्यासाठी हालचाली, मागण्या राजकीय स्तरावरून सुरू झाल्या आहेत. पण रत्नागिरी जिल्हय़ाने कोरोनावर मोठे नियंत्रण राखले होते. त्यामुळे येथील सर्वजणांना मोठा दिलासा लाभला होता. पण गुरूवारी आलेल्या कोरोना संशयितांच्या अहवालानुसार नव्याने 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. त्यामुळे साऱयांची चिंता पुन्हा वाढली आहे.
कोणत्याही प्रकारे जिह्याच्या हद्दी खोलून बाहेरील व्यक्ती येऊ देऊ नये, यासाठी येथील प्रशासकीय स्तरावर यंत्रणा सतर्क झाली आहे. कारण कोरोना नियंत्रणाला बाधा पोहोचली तर इतक्या दिवसांची साऱयांची, प्रशासनाची, आरोग्यसेवकांची, पोलिसांची सगळी मेहनत वाया जाईल आणि कोरोनामुक्त होण्यास खूप त्रास दायक होणार आहे. लगतचा सिंधुदुर्ग जिल्हय़ानेही कोरोनामुक्तीसाठी नियंत्रण मिळवले होते. पण कणकवलीत मुंबईवरून आलेल्या व्यक्तीला तब्बल दीड महिन्याने कोरोनाचा पुन्हा रुग्ण सापडला. त्यामुळे तेथील खबरदारीवर पुन्हा पाणी फेरले. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्य़ातील चाकरमान्यांच्या नातेवाईकांचीही अवस्थता वाढली आहे. आम्हाला तुमची काळजी आहेच, आपल्या सर्वांना कोरोना झालेला नाही. पण भारतातील व राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता, तुम्ही आमचे आहात, आपले आहात पण यावेळेला आपली गाव वाचवण्यासाठी आपल्याला अजून थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल, अशीही साद अनेकजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून घालत आहेत.
गावाकडे येण्यास सारेच आतूर आहेत. पण एखादा बाधित रुग्ण जरी गावाकडे आला तर गावांतील हे संकट थांबवणे खूप कठीण बनण्याची भीती गावकऱयांना सतावू लागली आहे. जिल्हय़ातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर चाकरमान्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी चाकरमानी गावात आल्यास त्यांना होमक्वारंटाईन करणे अशा उपाययोजनांसाठी त्या-त्या गावातील शाळा, अंगणवाडय़ा, हायस्कूल यांची माहिती सादर करण्याच्या सूचनाही ग्रा.पं.ना देण्यात आल्या आहेत.
चाकरमान्यांचा अहवाल आपले सेवा केंद्रामार्फत होणार सादर
चाकरमानी गावात आले तर एकीकडे धास्ती आणि दुसरीकडे शेजाऱयांमध्ये कोरोनावरून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनस्तरावरूनही उपाययोजना व योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रामकृतीदलाला सतर्क करण्यात आले आहे. चाकरमान्यांच्या आगमनावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाकरमानी आल्याचे दिसून येताच त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत तातडीने तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. या चाकरमान्यांचा सर्व अहवाल आपले सेवा केंद्रात नोंद केला जाऊन त्याचा ऑनलाईन अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे जिल्ऱहा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले आहेत.









