प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यामध्ये खाजगी सावकारकी व गावठी दारू राजरोसपणे सुरु असल्याची खंत आहे. आज जागतिक संकटामुळे लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. सर्व उद्योगधंदे नोकरी-व्यवसाय बंद स्वरूपात असल्याने मिळकत नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही तरुण व श्रीमंत व्यक्ती यांनी संगनमताने छुप्या पद्धतीने घर बसल्या व्यवसाय खाजगी सावकारी सुरू केला आहे. लोकांच्या जवळ पैसे नसल्यामुळे हे तरुण समोरील व्यक्तींकडून तारण म्हणून दोन चाकी, चार चाकी वाहने, प्रसंगी शेत व राहते घर गहाणवट म्हणून घेतात व पैसे देतात. पैसे घेणारी व्यक्ती अडचणीत असल्याने व समाजामध्ये मान असल्याने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी या सर्व गोष्टी करण्यास तयार असतात. समाजामधील असणारा स्वतःचा मान कमी होऊ नये म्हणून परस्पर बाहेरच्या बाहेर या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे अगोदरच अडचणीत असणारे कर्जबाजारी आपला असणारा समाजातील मान व होऊ घातलेला अपमान अशा गोष्टीमुळे मेटाकुटीस आलेले आहेत.
जे सावकारांकडून पैसे घेत आहेत तेसुद्धा पोलीस प्रशासनाला माहिती न देता हा सर्व अन्याय सहन करत आहेत. हेही चुकीचे आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तींबद्दल तक्रार दिली जावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. पण त्या गोष्टीकडे कर्जदारांकडून दुर्लक्ष करून अन्याय सहन करत आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करणे ही गरजेचे आहे. तसेच खाजगी सावकारकी करणाऱ्यांचा पोलीस प्रशासनाने शोध घेऊन सांगलीप्रमाणे प्रसंगी मोका लावण्याची आवश्यकता आहे. कोरोनाव्हायरस काळात पोलीस प्रशासन व्यस्त आहेत . बार व वाईन शॉप बंद असल्याने तळीराम गावठी दारूकडे वळले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही लोक गावठी दारू घेऊन निर्जन ठिकाणी, तर काही स्वतःच्या घरी, किराणामाल दुकान आदी ठिकाणावरून राजरोसपणे दारू विक्री चालू आहे.
समाजातील गुन्हेगारी कमी करायची असेल तर चांगल्या माणसांनी आपले विचार मांडणे व त्यासाठी प्रशासनाची मदत घेणे गरजेचे आहे. प्रशासनानेही अशा लोकांना खंबीरपणे साथ देऊन प्रशासनास मदत करणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही गावांमध्ये चुकीचे कार्य करणाऱ्यांना दहा वेळा विचार करावा लागेल.








