24 तासांत 12 रुग्णांची भर : बेंगळूर कोरोना नियंत्रणाच्या दिशेने
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याची राजधानी बेंगळूरमध्ये कोरोना रुग्ण संख्यावाढीवर नियंत्रण आलेले असतानाच बुधवारी गुलबर्ग्यात 8 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 52 वर पोहोचली आहे. राज्यात मागील 24 तासात 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यात गुलबर्ग्यातील 8, बेळगाव, दावणगेरे आणि म्हैसूर, तुमकूर जिल्हय़ात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर तुमकूरमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा बळी गेला आहे.
राज्यात बुधवारी सायंकाळपर्यंत रुग्णसंख्या 535 वर पोहोचली. तर मृतांची संख्या 21 झाली आहे. तर आतापर्यंत 216 जण संसर्गमुक्त झाले आहेत. गुलबर्ग्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या जिल्हय़ात मोमीनपूर येथील 55 वर्षीय व्यक्तीच्या प्रथम आणि द्वितीय संपर्कात आलेल्या (रुग्ण क्रमांक 205) 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो दिल्लीतील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिल्हय़ात बुधवारी 8 नवे रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.
म्हैसूर जिल्हय़ातील नंजनगूड येथील 26 वर्षीय युवकाला 346 क्रमांकाच्या रुग्णाशी संपर्का आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. म्हैसूर जिल्हय़ात आतापर्यंत 88 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 56 जण बरे झाले आहेत.
ग्रीनझोनमधील दावणगेरेत परिचारिकेला संसर्ग
तिन्हीही रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झालेल्या दावणगेरे जिल्हय़ात बुधवारी 35 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे आढळल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दावणगेरेतील बाशा नगर येथील रहिवासी असलेली महिला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद खातील परिचारीका आहे. दोन दिवसांपूर्वी घसा दुखीमुळे तिला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिचे स्वॅब शिमोगा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतर पुणे येथील प्रयोगशाळेकडेही स्वॅब पाठविण्यात आले होते. तेथील अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
तुमकूरमध्ये वृद्धाचा कोरोनामुळे बळी
तुमकूर जिल्हय़ात अस्थमा असलेल्या 73 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 26 एप्रिल रोजी जिल्हा इस्पितळात या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचे स्वॅब बेंगळूरमधील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. बुधवारी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सदर मृत वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, अशी माहिती तुमकूर जिल्हाधिकारी राकेशकुमार यांनी दिली आहे. हा वृद्ध वास्तव्यास असलेली केबीएच कॉलनी पूर्णतः सीलडाऊन करण्यात आली आहे.









