क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशन यांच्या वतीने पैलवानांसाठी अखिल भारतीय पातळीवर शारिरीक कसरत व्हीडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोना विषाणुमुळे विविध खेळांवर परिणाम झाला आहे. त्यात कुस्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. कुस्ती मैदाने, स्पर्धा होत नसल्यामुळे मल्लांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून त्यांना मदतीची गरज आहे.
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशन यांच्या वतीने मल्लांना आवाहन करण्यात आले आहे. स्वतःचा शारिरीक कसरत करतानाचा दीड मिनिटाचा व्हिडिओ करून अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनकडे पाठवायचा आहे. यातील विजेत्याला रोख 51 हजार रूपये, उपविजेत्याला रोख 31 हजार रूपये, तर तिसऱया क्रमांकाच्या विजेत्याला रोख 21 हजार रूपये देण्यात येतील. मल्लांना खुराकासाठी आर्थिक मदत व्हावी असा विचार ठेवून फेडरेशनने स्पर्धा आयोजित केली आहे. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपले नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा. इच्छुक मल्लांनी गुरूवार दि. 30 एप्रिलपर्यंत आपला व्हिडिओ फेडरेशनकडे पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी मल्लांनी हणमंत गुरव यांच्याशी संपर्क साधावा.









