तसा तर या अग्रलेखाचा मथळा असायला हवा होता….‘अलविदा इरफान’…. पण, इरफान खानच्या आयुष्याकडे पाहिल्यावर त्याला कायमचा निरोप द्यावा असे कोणाला वाटेल? बॉलीवूड असो की हॉलीवूड पिळदार देहयष्टीची, गोरीगोमटी, हसऱया चेहऱयाची व्यक्ती तिथे नायक म्हणून स्वीकारली जाते. त्याला आपण आपल्या समाधानासाठी अभिनेता म्हणायचे. पण, इरफान त्यापैकी नव्हता. सामान्य चेहऱयाचा, मोजके संवाद बोलणारा, तेवढाच अभिनय करणारा असा हा कलाकार. पण, तरीही सिनेमा पाहून झाला तरी तो लक्षात रहायचा तो कायमचा! कारण काय? तो सर्वसामान्यांच्यासारखा होता म्हणून की त्याचा अभिनय जिवंत होता म्हणून हे सांगणे फारसे कठीण नाही. तो होता सर्वसामान्यांसारखा. पण, त्याचा अभिनय मात्र असामान्य होता. जिवंत होता. खराखुरा वाटावा असाच होता. म्हणूनच भारतातून हॉलीवूडसाठी बोलावणे आलेला तो एक महान कलाकार बनू शकला. तो जसा अनपेक्षित पणे आला तसाच अनपेक्षितपणे निघून गेला. आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगला, कॅन्सरलाही तो त्याच सकारात्मकतेने सामोरे गेला. त्यावर त्याने मातही केली. कॅन्सरमधून उठून पुन्हा एक चित्रपटही बनवला. कोरोनामुळे तो चित्रपट रसिकांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. पण, आयुष्याच्या अखेरीच्या काही दिवसात डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. भव्य पडद्यावर नसेना का पण, लोकांच्या तळहातावर स्थिरावलेल्या मोबाईल स्क्रीनवर त्याने वाहवा मिळवली आणि सहजा सहजी त्याने डोळे मिटले. आपण मृत्यूशी लपंडाव खेळतो आहोत हे त्याला माहिती होते. ते वास्तवही त्याने स्वीकारले होते. फार थोडय़ा वेळात त्याला खूप खूप जगून घ्यायचे होते. कुटुंबाला वेळ द्यायचा होता. वेळ पुरत नाही म्हणजे नेमके काय हे त्यालाच फक्त माहिती झालेले होते. कारण, त्याचे घडय़ाळ थांबणार होते. आता कुठलीही चावी लागणार नाही हे माहीत असूनही तो पूर्ण क्षमतेने जगला. आपल्या सिनेमाला पहायला येण्याचे निमंत्रणही त्याने मायबाप रसिकांना देऊ केले. असण्या-नसण्याच्या सीमारेषेवर आपण आहोत पण, प्रयोग करायचे थांबवलेले नाही असे तो सांगत सांगत अचानक काळाच्या पडद्याआड गेला. त्याचा रोल संपला… पण, हा रोल त्याच्या काळाच्या पिढीच्या मात्र अंतापर्यंत लक्षात राहील! हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या सलाम बॉम्बे पासून कुठल्याही चित्रपटाची आणि दूरदर्शनवरील मालिकांची आठवण निघाली तरी त्याचे मनापर्यंत पोहोचणारे अल्पाक्षरी संवाद लोकांना आठवतात. अनेकांना जगण्यास उपयुक्त वाटतात. मकबूल, पानसिंग तोमर, द लंच बॉक्स, बिल्लू बार्बर, हिंदी मीडियम, हैदर, गुंडे, पिकू, तलवार अशा पन्नासएक चित्रपटातील त्याच्या भूमिका, त्यांच्याच जोरावर हॉलीवूडचे त्याला आलेले आमंत्रण आणि लाईफ ऑफ पाय, ज्युरासिक पार्क, अमेझिंग स्पायडरमॅनमधून घडलेले त्याचे दर्शन भारतीय रसिकाला सुखावत होते. त्याने केलेली छोटीशी जाहिरातही लोकांना आवडायची. रसिकांच्या मनावर असा ठसा उमटवणारा हा कलाकार राजस्थानच्या जयपूरमधून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पोहोचलाच होता एक चांगला कलाकार बनण्याच्या ईर्षेने. शाळेत त्याचे मन रमले नव्हते, आर्ट्सची पदवी घेऊन लेक्चरर बनायला चाललो आहोत असे आईला खोटेच सांगून त्याने घर सोडले होते. त्याचवेळी वडिलांचे छत्र हरपले होते आणि थोरला म्हणून कुटुंबाला त्याची आवश्यकता होती. पण, त्याचे ध्येय वेगळे होते. जबाबदारीचे ओझे छोटय़ा भावावर टाकून त्याने दिल्ली गाठली. पण त्याला मुंबई खुणावत होती. त्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्याने स्वतःला सिद्ध करण्याची एक संधीही सोडली नाही. कला हेच त्याचे आयुष्य बनले. कमी बोलणारा, दिसायला ‘स्टार मटेरियल’ नसलेला इरफान आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर पुढे आला. पण, या दरम्यान आयुष्याने त्याची खूप परीक्षा बघितली. मालिकांची कामे तग धरण्यासाठी त्याने केली. पण, चित्रपटांसाठी बोलावणे यावे असे त्याच्या बाबतीत काहीच दिसून आले नव्हते. या दरम्यान चित्रिकरणावेळी वेळ वाया घालवला म्हणून दिवसभरातील निम्मी कमाई दंड म्हणून कापून घेण्याचा प्रसंगही त्याच्या आयुष्यात घडला. पण, त्याने त्याला सकारात्मक पद्धतीने घेतले. तो खचला नाही. अभिनय करत राहिला आणि लोकांच्या पसंतीस उतरत राहिला. अखेर त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. सिनेमात तो हिरोहून मोठा वाटायचा. पण, त्याने एखाद्याला ‘खाऊन टाकलं’ असे वाटायचे नाही. त्याची भूमिका इतरांहून जिवंत वाटत रहायची. रसिकांच्या मनात त्याचे, त्याच्या आवाजाचेही स्थान होते. जंगल बुकमधील बलूच्या आवाजातून त्याने तोही प्रत्यय आणून दिला होता. अशा या कलाकाराला कॅन्सरने घेरले तेव्हा फिल्म इंडस्ट्रीत एक लाटच आली होती. विनोद खन्ना, राजेश खन्ना असे अभिनेते उतारवयात जर्जरावस्थेत मृत्यूला सामोरे जात होते. ऋषिकपूर, सोनाली बेंद्रे यांनाही मोठा धक्का बसला होता. आता हे दोघे सावरले आहेत. एक दिवस अचानक इरफाननेही आपण एका कॅन्सरला सामोरे जात आहोत आणि लोकांच्या सदिच्छांच्या जोरावर ही लढाई जिंकू असे जाहीर केले. लोक हळहळले. पण, त्याच्या आवाजाच्या आश्वासक सुरांनी तो मात करेल असा विश्वासही निर्माण झाला. दोन वर्षे त्याने कॅन्सरशी झुंजही दिली आणि त्यावर मातही केली. आयुष्याने आपल्या वाटय़ाला लिंबू दिले असतील तर त्याचे सरबत करून प्यावे ही म्हण सांगायला सोपी आहे. पण, ती जगताना खूप अवघड असते हा अनुभव सुद्धा त्याने रसिकांना बोलून दाखवला होता. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचा असा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संवाद सुरूच होता. कॅन्सरमुक्त झाल्यानंतरचा त्याचा इंग्लिश मीडियम हा चित्रपट पाहण्यास रसिक आतुर होते. पण, कोरोनाने निराशा केली. याही गोष्टीला त्याने सकारात्मक घेतले. चारच दिवसांपूर्वी त्याच्या मातेचे निधन झाले. टाळेबंदीमुळे त्याला मुंबई सोडता आली नाही. तेव्हा न डगमगता फोन व्हीडिओद्वारे त्याने अंत्यसंस्कार केले. दुःख पचवत पचवत तो आयुष्याच्या टाळेबंदीतून मुक्त झाला. मरता मरता जगणे शिकवून गेला. सलाम त्याला!
Previous Articleखाऊ आनंदे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








