गोव्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने सुरुवातीपासून आवश्यक निर्णय योग्यवेळी घेतले, त्यांची परिणामकारक अंमलबजावणीही केली. जनतेनेही गांभीर्य जाणून त्या निर्णयांना साथ दिली. मात्र त्याच सावंत सरकारने गोवा कोरोनामुक्त झाल्याची जाहीर घोषणा करण्याची घाई केली आणि फार मोठा धोका पत्करुन घेतला. त्यामुळे पंतप्रधानांप्रमाणे ‘नजर हटी… दुर्घटना घटी’ होण्यास वेळ लागणार नाही.
ही घोषणा केल्यामुळे सरकारला बक्षीस मिळणार होते की तशी घोषणा केली नसती तर दंड पडला असता काय, या प्रश्नांची उत्तरे गोवेकरांना मिळत नसल्याने प्रचंड नाराजी आहे. घोषणेबाबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही आश्चर्य व्यक्त करुन सरकारने एवढय़ात घाई करु नये, धोका संपलेला नाही, हे ध्यानात ठेवावे, असा सल्ला दिला, तो गोव्याच्या हिताचाच आहे. वास्तविक देशाची परिस्थिती पाहता, शेजारी महाराष्ट्र व कर्नाटकात कोरोनाने केलेला कहर पाहता गोवा सुरक्षित, कोरोनामुक्त आहे, असे म्हणण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही करणार नाहीत.
कोरोनाचा फैलाव न होण्याची आठ कारणे
विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असल्याने कोरोना गोव्यात दाखल होण्यासाठी वेळ लागणार नव्हती. मात्र सुरुवातीसच दाबोळी विमानतळावर उतरणाऱया प्रत्येक प्रवाशाची कोरोना प्रतिबंधक तपासणी करण्यात आली. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राष्ट्रांच्या विमानांना बंदी घालण्यात आली. काही दिवसांतच पूर्ण विमानतळ बंद करण्यात आला. गोव्यात कोरोनाचा फैलाव न होण्याचे हे पहिले कारण. तोपर्यंत भारतीय रेल्वे सुरु होती, मात्र दै. तरुण भारतने मडगाव रेल्वेस्थानकावरील परिस्थितीबाबत बातमीसाठी तेथे संपर्क साधला आणि दुसऱया दिवसापासून तेथेही गांभीर्य दिसून आले. पुढे संपूर्ण भारतीय रेल्वे बंद झाली, हे दुसरे कारण. गोव्यात कोरोनाचे जे सात रुग्ण सापडले ते विदेशांतून आलेले होते, त्यांना कोरोंटाईन करुन त्यांच्यावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोंटाईन करण्यात आले. हे सारे गांभीर्यपूर्वक झाल्याने पंतप्रधानांनी कोरोनाची सांखळी तोडण्याचे जे आवाहन केले होते, ते पूर्ण झाले, हे तिसरे कारण. त्यामुळे कोरोना व्हायरस गोव्याच्या समाजात पोहचू शकला नाही, हे चौथे कारण. बेजबाबदार, बेपर्वा लोक वगळता बहुतांश लोकांनी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार घरीच राहण्याचा संकल्प पूर्ण केला हे पाचवे कारण. लोकांनी ‘स्टे होम, स्टे सेफ’ पाळून पंतप्रधनांचा जनता कर्फ्यूच नव्हे तर संपूर्ण लॉकडाऊनही यशस्वी केला हे सहावे कारण. गोमंतकीयांमध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दलची काळजी आणि सामाजिक जबाबदारीचे भान होते, हे सातवे कारण. स्तःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स व संबंधित नर्सनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करुन त्यांना मृत्यूच्या जबडय़ातून परत आणले, आणि त्यांच्या संपर्कातील लोकांनाही ‘कोरोना रेंज’मधून बाहेर काढले हे गोव्यात कोरोनाचा फैलाव न होण्याचे आठवे कारण.
पोलिसांच्या कार्याला जनतेचा सलाम
गोव्यात सर्वकाही शंभर टक्के चांगले झाले अशातला भाग मुळीच नाही. दिवसरात्र पहारा देणाऱया पोलिसांनी लॉकडाऊन तोडणाऱया हजारो वाहचालकांना दंड देऊन वाहनेही जप्त केली. पहाऱयाबरोबरच गरीबांना जेवण पुरविण्याच्या पोलिसांच्या कार्याला सलाम करतानाच गाण्यांमधून कोरोनाबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या उपक्रमाची मात्र लोकांनी टर उडविली. कारण अशी जागृती करण्याएवढी अज्ञानाची परिस्थिती अजिबात नाही, अशी लोकांत भावना होती. कोरोनाबाबत जागृती होती म्हणूनच तर लोकांनी चांगले सहकार्य केले होते. याच काळात ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ म्हणीप्रमाणे काही लोकांना विनाकारण पोलिसांचा प्रसाद खावा लागला. त्यांना सतत काम करावे लागल्याने बराच त्रास झाला. देवी लईराईचे धोंडगण असलेल्या काही पोलिसांना रजा मिळाली नाही. त्यांना अनेक दिवस घरीही जाता आले नाही.
मुख्यमंत्र्यांची लागली कसोटी
महामारीचा किंवा आपत्तीचा कोणता अनुभव नसतानाही मुख्यमंत्र्यांनी कोरोना लॉकडाऊनचे हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रुपाने गोव्यात एकखांबी सरकार चालू असल्याचे जाणवले आणि पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या सरकारची आठवण अनेकांना झाली. त्यातूनच मगोचे ज्येष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांची ‘मुख्यंमत्र्यांनी तीनच मंत्र्यांचे मंत्रिमंडळ ठेवावे, खर्चात मोठी कपात होईल’, ही सूचना केली. विविध स्तरावरील अधिकाऱयांबरोबर विविध विषयांवरील बैठकांचा सकाळपासून रात्रीपर्यंत सपाटा, दुसऱया दिवशी परत आढावा बैठका, नव्या बैठका, केंद्र सरकार-प्रशासनाशी कायम संपर्क, नियम-निर्णयांची अंमलबजावणी, जनतेला माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदा हे करत असतानाच काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे याबरोबरच जनतेचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम राबविला.
गोवा कोरोनमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आणि तिथेच बरेच काही चुकल्याचे सध्या राज्यभरात दिसत आहे. 20 एप्रिलपासून येथे कोरोनाचे संकट वगैरे काही आहे, असे लोकांना अजिबात वाटत नाही. लोकांमधील कोरोनाची भीती गायब, गांभीर्य संपले. काम नसणारेही लोक खुलेआम फिरु लागले. जाईल तिथे लोकांची, वाहनांची गर्दी वाढली. मास्क वापरणे, सोशियल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मास्क न वापरणाऱयांवर शंभर रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांबरोबरच तलाठी, पंचायत सचिव तसेच नगरपालिका निरीक्षकांनाही द्यावा लागला. एका दुचाकीवर चालकच असावा, कारमध्येही चालकासह दोघेच अन्यथा दंड देण्याची वेळ सरकारवर आली. या सर्वांहून मोठा धोका वाढला आहे तो रस्ते, आडवाटा, पायवाटाद्वारे होणाऱया वाहतुकीमुळे. कर्नाटक, महाराष्ट्रातील लोक, वाहने गोव्याच्या अनेक भागांमध्ये पोहोचल्याच्या बातम्या रोज छायाचित्रांसह प्रसिद्ध होत आहेत. सीमावरील बंदोबस्तासह आडवाटांवरही कडक पहारा ठेवणे गरजे आहे. कारण पंतप्रधान म्हणतात त्या प्रमाणे ‘नजर हटी दुर्घटना घटी’ व्हायला वेळ लागणार नाही.
अन्यथा गेले सुमारे दोन महिना घेतलेली काळाजी, परिश्रमांवर पाणी पडू शकते. शेवटी ‘जान हैं तो जर्हॉं’ हे लक्षात ठेवूनच आणखी काही दिवस त्रास सोसले तर चांगले दिवस येतील.
राजू भिकारो नाईक