प्रतिनिधी / गडहिंग्लज
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही बेजबाबदारपणे शासनाचे नियम बाजूला सारत रस्त्यावरुन हिंडणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी गडहिंग्लज नगरपालिका प्रशासनही आता रस्त्यावर उतरले आहे. बुधवारी दिवसभर 40 व्यक्तींवर कारवाई करत 4 हजाराचा दंड वसूल केला आहे. गुरुवारपासून या कारवाईची व्याप्ती वाढविणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. राज्यात संचारबंदीही लागू आहे. याचे नियम असतानाही या नियमांकडे दुर्लक्ष करत काही मंडळी घराबाहेर पडत फिरताना दिसत आहेत. आत्तापर्यंत अशांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता नगरपालिकाही कारवाई करणार आहे.
यापुढे हॅडग्लोज न वापरल्यास व्यापाऱयांवर कारवाई होणार आहे. याशिवाय सामाजिक अंतर राखण्यासाठी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे. याकडे दुकानदाराचे दुर्लक्ष झाल्यास यासाठीही दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. प्रती ग्राहक 100 रु. असा दंड राहणार आहे.