ऑनलाईन टीम / मुंबई :
सुप्रसिद्ध, दिग्गज अभिनेते इरफान खान यांची दीर्घकाळापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.









