वार्ताहर / सावईवेरे
लॉकडाऊन काळात परराज्यातून येणाऱया भाजीवर निर्बंध घातल्याने गावठी भाजीला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. मुळा व तांबडी भाजीच्या दोन जुडय़ा चाळीस रुपयांपर्यंत विकल्या जातात. अशा परिस्थितीत कुणी स्वतःचा भाजी मळा लावून ही भाजी गरीब व गरजूंना मोफत वितरित करीत असेल तर ती खरी जनसेवा म्हणावी लागेल. वळवई येथील नंदुकमार उर्फ नंदू चंद्रकांत तारी हा युवक लॉकडाऊनमध्ये अनोखी समाजसेवा करीत आहे.
नंदूच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे वळवई भागात हा कौतुकाचा विषय बनला आहे. वळवई येथील ऍन्थोनी डायस यांच्या मालकीच्या जागेत नंदूने भाजीपाल्याची लागवड केली आहे. या मळय़ात तो स्वकष्टाने भाजीचे पीक घेतो. आपल्या मळय़ात उगवणारी ही ताजी व गावठी भाजी तो वळवई भागात लोकांना मोफत वितरित करीत आहे. त्याच्या मळय़ात तांबडी भाजी, मुळा, पालक, भेंडी, चिटकी, वांगी, वाल या भाज्या पिकतात. त्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे वळवई व सावईवेरे भागात नंदू हा ‘अपना नंदू’ या टोपण नावाने सुपरिचित झाला आहे. नंदू हा पेशाने व्यावसायिक आहे. लॉकडाऊनमुळे त्याचा व्यावसाय बंद असल्याने या काळात लोकांना मोफत भाजी वितरित करुन तो सामाजिक बांधिलकी जपत आहे. फेब्ा्रgवारी महिन्यात भाजीची लागवड करुन स्वतःच्या मेहनीवर त्याने हा मळा फुलविला. भाजी व्यावसायामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ नसून निव्वळ समाजिक बांधिलकी म्हणून त्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.
नंदूशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, गेली सलग तीन वर्षे भाजीपाल्याची लागवड करून वळवई भागातील गरजू लोकांनाच नव्हे तर गावातील इतर लोकांनाही आपण मोफत भाज्या देत आहे. विविध प्रकारच्या भाजीची लागवड करण्यासाठी ऍन्थोनी डायस यांनी त्याला मोफत जमीन उपलब्ध करुन दिली आहे. लॉकडाऊन काळात दि. 23 मार्चपासून ते आजपर्यंत सुमारे शंभर कुटुंबियांना नंदूने मोफत भाजी पुरविली आहे. या उपक्रमातून समाजसेवेचा जो आनंद मिळतो, त्यापेक्षा कुठलाही नफा मोठा नाही, अशी त्याची भावना आहे.









