1450 जण चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी बेळगावला थोडासा दिलासा मिळाला. दुपारी व सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावच्या एकाही रुग्णाचा उल्लेख नव्हता. मात्र, अद्याप जिल्हा प्रशासनाला 984 जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवालाची प्रतीक्षा आहे.
आरोग्य विभागाने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये राज्यातील आठ जणांचा समावेश होता. सायंकाळच्या बुलेटिनमध्ये ही संख्या नऊवर पोहोचली. बेंगळूर, मंडय़ा, मंगळूर, जमखंडी (जि. बागलकोट) व विजापूर येथील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. सोमवारीही बेंगळूर, म्हैसूर पाठोपाठ बेळगाव तिसऱया क्रमांकावर होते. तर चौथ्या क्रमांकावर विजापूर येऊन पोहोचले आहे.
बेंगळूर येथील एकूण रुग्णांची संख्या 134 असल्यामुळे राजधानी पहिल्या क्रमांकावर तर 89 रुग्णसंख्या असलेला म्हैसूर दुसऱया क्रमांकावर आहे.. 54 रुग्णसंख्या असणारा बेळगाव तिसऱया व 41 रुग्णसंख्या असणारा विजापूर चौथ्या क्रमांकावर आहे. बेळगाव, विजापूरच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या बेंगळूर व म्हैसूरला अधिक आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने सोमवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ात एकूण 3 हजार 630 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे तर 1450 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 47 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हय़ात आतापर्यंत 2 हजार 685 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 1626 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 54 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. उपचाराअंती कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आणखी 984 जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल यायचा आहे. एक-दोन दिवसात यामधील निम्मे अहवाल उपलब्ध होणार आहेत. त्यावेळी बेळगाव जिल्हय़ातील खरे चित्र सामोरे येणार आहे.
कोरोनामुक्त होणाऱयांच्या संख्येत वाढ
सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 47 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी पाठविण्यात आले आहे. ही संख्या वाढत चालली असून आणखी आठ ते दहा जणांची वाटचाल कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने चालली आहे. स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर सरकारच्या मार्गसूचीनुसार टप्प्याटप्प्याने त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती बिम्सच्या सूत्रांनी दिली.









