वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूचा प्रसार 26 राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्याची माहिती रविवारी केंद्र सरकारच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. देशातील रुग्णसंख्या 28 हजार 380 वर पोहोचली असून सर्वाधिक प्रभावित असलेल्या केवळ नऊ राज्यांमध्ये जवळपास साडेचोवीस हजार (88 टक्के) रुग्ण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, देशातील 85 जिल्हय़ांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच अद्याप तीन जिल्हेही पूर्णपणे कोरोनामुक्त असल्याचे सांगण्यात आले.
16 जिल्हय़ांमध्ये 28 दिवसांत एकही नवा रूग्ण नाही
गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील 16 जिल्हय़ांमध्ये गेल्या 28 दिवसांमध्ये तर, 85 जिल्हय़ांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच अद्याप तीन जिल्हे पूर्णपणे कोरोनामुक्त असल्याचे सांगण्यात आले. रुग्णांची प्रकृती पूर्वपदावर येण्याच्या प्रमाणातही सुधारणा होत असून हा सुधारणार दर 22.71 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात आंध्रप्रदेशमध्ये 80 रुग्ण सापडले होते. त्याचबरोबर राजस्थानमध्ये 49, पश्चिम बंगालमध्ये 38, बिहारमध्ये 13, कर्नाटकमध्ये 8, ओडिशात 5 आणि हरियाणामध्ये 3 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. सद्यस्थितीत 26 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये संसर्ग झालेला आहे. एकूण रुग्णांपैकी 20 हजार 835 जणांवर वेगवेगळय़ा रुग्णांलयांमध्ये उपचार केले जात असून 6 हजार 184 रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचा दावा करण्यात आला.
आरोग्यमंत्र्यांचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या ओएसडी कार्यालयातील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले. तसेच दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये सेवा बजावत असलेल्या 74 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एम्स रुग्णालयातील एका परिचारिकेचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून त्याचा संसर्ग तिच्या दोन मुलांनाही झाला आहे.
वीट भट्टय़ांसह काही सेवांना अनुमती
लॉकडाऊन काळात काही सेवा-सुविधा सुरू करण्यास अनुमती देण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले. देशातील 80 टक्के भाजीपाला विक्री केंद्रे किंवा बाजार सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 60 टक्के अन्न-फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येत असून यामुळे शेतकऱयांकडील उत्पादनांची खरेदी-विकी सुलभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील वीट भट्टय़ांचा व्यवसायही सुरू करण्यात आला असून मनरेगा अंतर्गत सुरू असलेली कामेही सुरू करण्यात आली आहेत. सध्या देशात दोन कोटी मजूर काम करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.









