सदरची रक्कम 16 दिवसात केली सादर : कोरोनाच्या संकटात कर विभागाचा दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या जगासोबत भारतही कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध मार्गांवर लढाई लढतो आहे. यात आरोग्यासोबत त्याला आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी झटावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यात विविध योजनांच्या माध्यमातून सरकार आर्थिक सहाय्य जनतेला देण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ(सीबीआयसी) या विभागाकडून आठ ते 23 एप्रिल या कालावधीत 10,700 कोटी रुपयाचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच सीमा शुल्क परतावा सादर केला आहे. तर 9,818.12 कोटी रुपयाचे जीएसटीचे 1.07 लाखापेक्षा अधिकचे दावे निकाली काढण्यात आले असल्याचे सीबीआयसीच्या एका ट्विटद्वारे अधिकाऱयांनी सांगितले आहे. या व्यतिरिक्त 915.56 कोटी रुपयाचे 1.86 लाखापेक्षा अधिकचे सीमा शुल्क परताव्याचे दावे निकाली काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना या महामारीमुळे मोठे संकट निर्माण झाले असल्याने जीएसटी कर करदात्यांना किंवा आयात निर्यात करण्यात येणाऱया व्यापाराला ही मोठी मदत होणार आहे. यासाठी विशेष रिफंड अभियानाच्या अंतर्गत वेगाने परतावा सादर करण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे सीबीआयसीने म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाने आठ एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोकांना दिलासा मिळावा यासाठी जीएसटी आणि सीमा शुल्कशी संबंधीत प्रलंबित परताव्यांचे दावे निकाली काढण्याचे काम वेगाने हाती घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर विभागाने यावेळी सांगितले आहे. तसेच या प्रकियेतून तब्बल 18 हजार कोटी रुपयाचा परतावा देण्याचे अनुमान आहे. त्यामुळे जीएसटी आणि सीमा शुल्कचा परतावा घेण्यासाठी दावा सादर करताना आपण कागदी दस्ताऐवज देण्याऐवजी अधिकत्तर माहिती पाठविण्यासाठी ई मेलचा वापर करावा अशा सूचनाही कर विभागाने याप्रसंगी केल्या आहेत.









