कुडाळमधील घटना
मृत युवा कामगार मूळ ओरिसा येथील
एरिया लाईटच्या वायरला झाला स्पर्श
शनिवारी रात्रीची घटना
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ-उद्यमनगर येथील एका हॉटेलच्या प्रवेशद्वारानजीक एरिया लाईटच्या वायरला स्पर्श होऊन हॉटेलचा कामगार ब्रजमोहन मंगुलीचरण रौत (21, मूळ रा. ओरिसा) याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्याला हॉटेल व्यावसायिक व सहकारी कामगारांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. पण काही वेळातच त्याचे निधन झाले. या घटनेची खबर राकेश उमाकांत म्हाडदळकर यांनी कुडाळ पोलिसांत दिली. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
राकेश म्हाडदळकर यांचे येथील उद्यमनगर येथे हॉटेल आहे. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलमधून बाहेर पडले आणि समोर उभी केलेल्या आपल्या कारच्या दिशेने गेले. त्यांच्यासोबत ब्रजमोहन रौत बाहेर पडून प्रवेशद्वारानजीक गेला. तेथे एरिया लाईटसाठी घेतलेल्या वायरचा स्पर्श त्याला झाला. तो ओरडला आणि विजेच्या धक्क्याने जमिनीवर कोसळला. म्हाडदळकर यांनी आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली. अन्य कामगारांना बोलावून त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये यांनी उपचार सुरू केले. पण काही वेळातच त्याचे निधन झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार संजय वराडकर व अमोल महाडिक यांनी पंचनामा केला.
ही विद्युतभारीत वायर जमिनीखालून आली आहे. ती नेमकी कुणाची आहे, याबाबत महावितरणला पत्र देऊन माहिती घेण्यात येणार आहे, असे हुलावळे यांनी सांगितले. तपास वराडकर करीत आहेत.
ब्रजमोहन गेल्या तीन वर्षांपासून या हॉटेलात कामाला होता. तो हाऊस किपिंगचे काम करायचा. जगतसिंहपूर-ओरिसा येथील तो मूळ रहिवासी होत. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. ब्रजमोहनच्या गावातील कामगार या हॉटेलमध्ये कामाला आहेत. त्यांच्यामार्फत त्याच्या नातेवाईकांना या घटनेची कल्पना देण्यात आली.
ब्रजमोहनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोरोनामुळे ओरिसा राज्यातून येथे येणे अडचणीचे ठरणार आहे. त्याचा मृतदेह तोपर्यंत ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे. ओरिसा येथे त्याचा मृतदेह नेण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन व म्हाडदळकर यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.









