जगभरात आतापर्यंत 1 लाख 97 हजार 850 बळी : इटलीत कोरोना संसर्गामुळे 26 हजार जणांचा मृत्यू
जगात कोरोना विषाणूची बाधा 28 लाख 46 हजार 154 जणांना झाली आहे. तर 1 लाख 97 हजार 850 जणांना जीव गमवावा लागला आहे. 8 लाख 11 हजार 691 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 618 स्थलांतरित कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील एकूण रुग्णांचा आकडा 12 हजार 693 झाला आहे. इटलीतील नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. शुक्रवारी देशात 420 जणांना जीव गमवावा लागला आहे.
श्रीलंकेत संचारबंदी लागू

श्रीलंकेत सरकारने पुन्हा 24 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. शुक्रवारी तेथे 46 नवे रुग्ण सापडल्याने एकूण आकडा 420 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेमध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 हजार जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेला भारताकडून मदत केली जात आहे.
पाक : 9 मेपर्यंत टाळेबंदी

महामारी वाढत चालल्याने पाकिस्तानात 9 मेपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 11 हजार 940 रुग्ण सापडले असून 253 जणांचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदीचा निर्णय सर्व प्रांतीय सरकारांशी सल्लामसलत केल्यावर घेतला गेल्याची माहिती पाकिस्तानचे मंत्री उमर उसाद यांनी दिली आहे.
चीनने खरी माहिती मांडावी

विषाणूच्या उत्पत्तीसंबंधी चीनने खरी माहिती जगासमोर मांडावी, असे विधान अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी केले आहे. चीनकडून अचूक माहिती मांडण्यात आल्यास लोकांचा जीव वाचविण्यास मदत मिळेल. विषाणू वुहानमधून पसरल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. हा विषाणू कशामुळे निर्माण झाला हे शोधण्याची गरज असल्याचे पॉम्पियो म्हणाले.
घरगुती हिंसाचारात वाढ

टाळेबंदीच्या कालावधीत ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांवरून सुमारे 4 हजार जणांना अटक करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गामुळे दिवसभरात 684 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बळींचा आकडा आता 19,506 झाला आहे. तर 1 लाख 43 हजार 463 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्येही संसर्ग कमी होऊ लागला आहे.
अमेरिकेत चित्र बदलतेय

अमेरिकेत 24 तासांमध्ये 1951 जणांचा मृत्यू झाला असून 38 हजार 764 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथे आतापर्यंत 52 हजार 217 जणांना जीव गमवावा लागला आहे. परंतु जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार शुक्रवारी 1258 जणांना जीव गमवावा लागला असून मागील 3 आठवडय़ांमध्ये हा सर्वात कमी आकडा ठरला आहे. न्यूयॉर्क शहरात दिवसभरात 422 जणांना जीव गमवावा लागला आहे. 31 मार्चनंतर पहिल्यांदाच बळींचा आकडा कमी राहिला आहे. प्रांतातील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून रुग्णांची संख्या घटू लागल्याचे उद्गार गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी काढले आहेत.
युरोपीय संघाचा अहवाल

चीन रोखू पाहणारा युरोपीय महासंघाचा अहवाल अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात चीनने संसर्गासंबंधी चुकीची माहिती दिल्याचा आरोप नमूद आहे. हा अहवाल यापूर्वी 21 एप्रिल रोजी प्रकाशित होणे अपेक्षित होते. परंतु चीनच्या दबावामुळे अहवाल 25 एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.
इटलीत संसर्गामध्ये घट

इटलीतील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 5 आठवडय़ांच्या कालावधीत पहिल्यांदाच एका दिवसात सर्वात कमी जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत आतापर्यंत 150 डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे. इटलीत 25 हजार 969 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 1 लाख 92 हजार 994 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तुर्कस्तानात लाखाहून अधिक

तुर्कस्तानात 3,122 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर देशातील एकूण बाधितांचा आकडा आता 1,04,912 झाला आहे. मागील 24 तासांत 109 जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 2600 वर पोहोचल्याची माहिती तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहार्टिन कोजा यांनी दिली आहे. तुर्कस्तानात 11 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता.
अमेरिकेसह जगातील सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात लढा सुरू असताना 107 वर्षीय महिलेला हा संसर्ग व्हावा आणि ती बरी होऊन घरी परतणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. स्पेनमधील एना डेल वाल्ले यांचा जन्म ऑक्टोबर 1913 मध्ये झाला होता. 107 वर्षीय एना यांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. विशेष बाब म्हणजे 1918 मध्ये त्यांनी स्पॅनिश फ्ल्यूच्या संसर्गावर मात केली होती. 1918 मध्ये एना यांना स्पॅनिश फ्ल्यूची लागण होत त्या बऱया झाल्या होत्या. वयाच्या 107 व्या वर्षी यंदा त्यांना घातक कोरोना विषाणूची लागण झाली आणि यातूनही त्या सुखरुप बाहेर पडल्या आहेत. एना यांचे हे प्रकरण जणू एखादा चमत्कारच आहे. स्पॅनिश फ्ल्यूची साथ 36 महिने (जानेवारी 1918 ते डिसेंबर 1920) राहिली होती आणि याची 50 कोटी लोकांना लागण झाली होती.









