केंद्र सरकारचा निर्णय, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून रॅपिड टेस्टींगसाठी वापरण्यात येणाऱया कीटबाबतच्या वाढत्या तक्रारी पाहून केंद्र सरकारने त्याचा वापर थांबवला होता. आता हे सर्व दर्जाहीन, सदोष कीट संबंधित देशांना परत पाठवले जाणार आहेत. यामध्ये चीनमधून सर्वाधिक 5 लाख कीट मागवण्यात आली होती. मात्र आता ती परत दिली जाणार असून त्यांचे बिल पेमेंटही थांबवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली.
मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. दर्जाहीन अँटीबॉडी टेस्टींग कीट संबंधित देशांना परत केले जाणार आहेत. या कीटमधून तपासणी केली असता येणारे अहवाल संशयास्पद वाटत असल्याने याआधीच भारताने आयसीएमआरच्या सल्ल्यानुसार त्याचा वापर थांबवला आहे. भारतीय निष्कर्षांच्या आधारावर त्यांचा दर्जा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांचे पैसेही दिले जाणार नाहीत, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनीही सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर याविषयी व्हीडिओ कॉन्फरन्सिद्वारे संवाद साधून माहिती घेतली होती.
हे कीट वेगवेगळय़ा देशांकडून मागवण्यात आले होते. परंतु वैद्यकीय मापदंडाच्या निकषावर त्यांचा दर्जा कमी आणि दोषपूर्ण असल्याचे समोर आले आहे. म्हणूनच ती परत केली जाणार आहेत. मग तो देश चीन असला तरीही त्याचे पैसे दिले जाणार नाहीत, असे आरोग्य राज्यमंत्री चौबे म्हणाले. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आश्वासित करताना ते म्हणाले, अधिक गरज पडल्यास राज्यांच्या मदतीला आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांना पाठवण्यात येईल. लागेल ती सर्व वैद्यकीय आणि आर्थिक मदत दिले जाईल. त्यांच्या मागणीनुसार संबंधित राज्यांना मदत पुरवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
युरोपने नाकारली, चीनने भारतात पाठवली
भारतामध्ये ज्या तपासणी कीट संबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत ती कीट याआधी निकषपूर्ती अभावी आणि दर्जाहीन असल्याने युरोपीय देशांनी नाकारली आणि परत पाठवली होती. या कीटमधील अहवालही खात्री लायक नसल्याने हा निर्णय त्यांनी घेतला होता. चीनने एक महिन्यानंतर तीच कीट भारताला पाठवून दिली. सुरुवातीला त्यातून केलेल्या काही चाचण्यांचे अहवाल योग्य व समाधानकारक आले. तथापि नंतर राज्यांना पाठवल्यावर त्यांच्यातील दोष उघड झाले. म्हणून त्याचा वापर तत्काळ थांबवण्यात आला.
आतापर्यंत आली 8.5 लाख कीट
चीनमधील व्हांडोफ बायोटेक व लिव्हजोन डायग्नोस्टिक या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 8.5 लाख कीट भारतात पाठवण्यात आली आहेत. याची किमत सुमारे 40 कोटी आहे. यात व्हांडोफ कंपनीची 60 टक्के कीट आली आहेत. याच कंपनीने 20 लाख कीट ब्रिटनला मार्च महिन्यात दिली होती. मात्र त्यामध्ये गडबड आढळून आल्याने त्याची आयात ब्रिटनने थांबवली.









