वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोना व्हायरस महामारीचा उद्रेक पूर्णपणे थांबल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील अर्थकारणावर मोठे परिणाम झालेले पहावयास मिळतील. यामुळे क्रीडापटूंना भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असे मत ऑलिम्पिक सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केले आहे.
कोरोना व्हायरसच्या लढाईत क्रीडापटू अनेक प्रकारे मदत करून बाधितांच्या जखमांवर मलमपट्टी लावण्याचे काम करीत मोलाची भूमिका बजावत असल्याची जाणीव अभिनव बिंद्राला आहे. ‘मात्र या कोरोनारूपी भूकंपामुळे क्रीडा अर्थकारणाला सर्वाधिक फटका बसणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोणतीच स्पर्धा होत नसल्याने अनेक क्रीडा संघटनांचे व खेळाडूंचे उत्पन्नच थांबले आहे. त्यामुळे निधीअभावी क्रीडापटूंना ते मानधन देऊ शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. क्रीडापटूंसमोरील हे सर्वात मोठे आव्हान असून त्यावर प्रथम मात करण्याची गरज आहे. त्यांना पुरेसे पाठबळ मिळाल्यास निश्चितपणे ते सराव पुढे चालू ठेवू शकतील. यापूर्वीही युद्धानंतर निर्माण झालेल्या स्थितीशी किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर क्रीडा जगताने पुढाकार घेऊन मदत केलेली आहे. दुसऱया महायुद्धानंतर क्रीडा जगताने जी भूमिका निभावली, तशी सकारात्मक भूमिका ते आताही बजावू शकतात. पण यासाठी त्यांना आधी स्थिरस्थावर व भक्कम व्हावे लागेल,’ असे बिंद्रा म्हणाला.









