दीर्घ आजारानंतर गोमेकॉत अखेरचा श्वास
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसची एकेकाळी तोफ ठरलेले व वजनदार माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे दीर्घ आजारानंतर मंगळवारी सायंकाळी गोमेकॉमध्ये निधन झाले. ते 64 वर्षाचे होते. पेडणेतील बागायतदार, भाटकार म्हणून परिचित असलेले देशप्रभू हे पेडणे मतदारसंघातून दोनवेळा गोवा विधानसभेवर निवडून आले होते.
काँग्रेसचे प्रवक्ते आणि ‘व्हिस्काउंट द पेरनेम’ या नावाने परिचित राहिलेले जितेंद्र देशप्रभू हे उत्तम वक्ता, व्यासंगी, अभ्यासू इंग्रजी व मराठी या दोन भाषांवर प्रभूत्व राहिलेले, इंग्रजी व मराठी पुस्तकांचे सातत्याने वाचन करणारे जितेंद्र देशप्रभू ही काँग्रेसची एक तोफ ठरली होती.
सुरुवातीपासून काँग्रेसमधून राजकारण
आपले मुद्दे, विचार ठासून सांगणारे जितेंद्र देशप्रभू सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाबरोबर राहिले. त्यातूनच ते पुढे आमदार बनले. स्वतः कृषी क्षेत्रात बीएससीची पदवी प्राप्त केलेले जितेंद्र देशप्रभू यांनी 1999 मधील निवडणुकीत प्रथम विजय प्राप्त केला. त्यानंतर 2002 च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. 2007 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही या तडफदार आणि फायरब्रँड ठरलेल्या नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांची नाराजी होती.
बीएससी ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण
31 मार्च 1956 रोजी जन्मलेल्या जितेंद्र देशप्रभू यांनी बीएससी ऍग्रीकल्चरपर्यंत शिक्षण संपादन केले होते. गोवा विधानसभेवर 1999 मध्ये निवडून आल्यानंतर विविध समित्यांवरून त्यांनी काम केले. नेहमीच भाजपसारख्या विरोधी पक्षावर तोंडसुख घेणारे जितेंद्र देशप्रभू यांनी मनोहर पर्रीकर जेव्हा 2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार तोफ डागली होती.
देशप्रभू नावाची भाजपविरोधी तोफ
तोफ डागताना ते कोणाचाही मुलाहिजा राखत नव्हते. त्यामुळेच त्यांनी अनेक राजकीय हितशत्रूही निर्माण केले, मात्र आपल्या निवेदनापासून ते कधीही मागे हटले नाहीत. गाढा आभ्यास करणारे देशप्रभू हे सदैव काँग्रेसशी प्रामाणिक राहिले. 1999 पासून 2007 पर्यंत त्यांनी विधानसभेत भाजपवर अक्षरशः तोफ डागत विधानसभेत आपला बुलंद आवाज गाजविला होता.
काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून वेगळा ठसा
अभ्यासपूर्ण आणि भाषेवर प्रभूत्व तसेच ठासून बोलण्याची पद्धत यामुळे काँग्रेसने त्यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून नियुक्त केले होते. संगीताची आवड असलेल्या जितेंद्र देशप्रभूंना गायन करताना अनेकांनी पाहिले व सुखद अनुभव घेतला. जगातील अनेक देशांमध्ये भ्रमण करून आलेल्या देशप्रभू यांनी आपले अनुभवही कैकवेळा विधानसभेतील भाषणांमध्ये मांडले होते.
गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष, रावराजे काकासाहेब देशप्रभू शैक्षणिक संस्थेचे चेअरमनपद देशप्रभू सांभाळत होते. गोवा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे बोर्ड ट्रस्टी अशी अनेक पदे देशप्रभू यांनी सांभाळली होती. गोवा क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या देशप्रभू यांनी ग्रामीण भागातून क्रिकेटपटू निवडीसाठी अनेक बाबतीत पुढाकार घेऊन प्रशिक्षण योजना सुरू केली होती.
जितेंद्र देशप्रभू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तसेच भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच पेडणे शहरात हळहळ व्यक्त झाली. काँग्रेस पक्षाशी नेहमीच एकनिष्ट राहिलेल्या केवळ काँग्रेस नेत्यांच्या आग्रहाखातर उत्तर गोव्यात राष्ट्रवादी पक्षात जाऊन त्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून श्रीपाद नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले व थोडक्यात विजय हातून निसटलेल्या जितेंद्र देशप्रभू यांनी त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षातच प्रवेश केला आणि ते पुन्हा काँग्रेसचे प्रवक्ते बनले होते.
गोवा तडफदार नेत्याला मुकला : दिगंबर कामत
प्रतिनिधी / मडगाव
आपले मित्र व पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या आकस्मिक निधनाने आपल्याला तीव्र धक्का बसला आहे. गोवा एका तडफदार नेत्याला मुकला आहे. एक अभ्यासू आमदार व प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे. जितेंद्र देशप्रभू हे काँग्रेस पक्षाचे खंदे नेते होते व पक्षासाठी त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गोमंतकीयाना धक्का बसला असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
एक फायरब्रँड नेता हरपला : गिरीश चोडणकर
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस नेते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनाने काँग्रेस प्रदेश समितीला तीव्र दुःख झाले आहे. देशप्रभू हे एक सच्चे काँग्रेस कार्यकर्ते होते. त्याचबरोबर फायरब्रँड राजकीय नेते होते. गोव्याने एक हुशार नेता गमावला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
त्याचे मोलाचे असे मार्गदर्शन आपल्याला सततपणे लाभले. विशेषतः युवक काँग्रेस चळवळीत असताना त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचे सहकार्य आपल्या कायम स्मरणात राहणार आहे. पक्षाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. 2000 ते 2007 या काळात विधानसभेत विरोधात असताना त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांचे वक्तव्य प्रभावी होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असेही ते म्हणाले.









