‘मारेला डिस्कवरी’तील खलाशांचा प्रश्न
प्रतिनिधी / मडगाव
आम्ही जर युरोपमध्ये पोचलो तर कोरोना व्हायरसमुळे आम्ही आजारी पडू व त्यात आम्हाला मृत्यू आला तर आमचे मृतदेह आणण्यात सरकारला आनंद असेल का?, आम्हाला जीवंत आणण्यात सरकारला जमत नाही का? अशी भावनिक हाक ‘मारेला डिस्कवरी’ या जहाजावरील गोमंतकीय खलाशांनी मारली आहे.
मुंबईच्या बंदरात मारेला डिस्कवरी हे जहाज गेले जवळपास 40 दिवस नांगरून ठेवले आहे. या जहाजावर 66 गोमंतकीय खलाशी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न सुरु असले तरी अद्याप यश न आल्याने, हे खलाशी अडचणीत सापडले आहेत. आज किंवा उद्या हे जहाज युरोपकडे प्रयाण करणार आहे. त्याची सुटका करण्यासाठी आज बुधवार हा शेवटचा दिवस असल्याचा व्हिडिओ या खलाशांनी सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे.
गेले 40 दिवस मुंबईत जहाजावर असलेल्या या खलाशांनी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे. आपली सुटका करावी यासाठी या युवकांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. परंतु, त्यांचा विषय गांभीर्याने घेतला नाही. या खलाशांचा विषय आज सुटणार, उद्या सुटणार अशी केवळ घोषणाबाजी करण्यात आली. पण, प्रत्यक्षात कोणतीच कृती झाली नसल्याने, या खलाशांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज जर सुटका झाली नाही तर जहाज युरोपकडे प्रयाण करेल व त्यानंतर जर आम्ही आजारी पडलो तर पुन्हा भारतात आल्यावर आम्हावर उपचार करतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता आमची प्रकृती ठिक आहे. उद्या जर आजारी पडलो अन् त्यात मृत्यू आला तर आमचे मृतदेह आणण्यात सरकार धन्यता मानेल का? असा भावनिक सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे. या खलाशांनी मुख्यमंत्री तसेच आमदार व मंत्र्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतलाय व सुटकेसाठी याचना केलीय.









