लोकांच्या स्वैर संचाराला सरकार जबाबदार : सुदिन ढवळीकरांचा आरोप
वार्ताहर / मडकई
कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कार्यकाळ 3 मे पर्यंत वाढविला असला तरी नियम शिथिल करीत गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात लोकांचा निर्धास्तपणे वावर सुरु झाला आहे. राज्यातील सर्व सातही संशयित रुग्णांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने सरकारने गोवा राज्य कोरोनामुक्त जाहीर केले आहे. त्याचा लाभ उठवित लोकांचा स्वैर संचार चालला आहे. त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.
कोरोनाचे संकट टळले तरी ते पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही, याचे भान ठेऊन प्रत्येकाने जबाबदारीने व खबरदारीने वागण्याचे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरानाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यात त्याचा प्रभाव कायम आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमा गोव्याशी भिडल्या आहेत. चुकुन एखादा रुग्ण गोव्यात आल्यास संसर्गाची साखळी तयार होऊ शकते. याचा विचार सरकारने केला पाहिजे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यासह डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱयांनी चांगली कामगिरी केली आहे. पण एवढय़ावरच समाधान न मानता यापुढे अजून काही दिवस काळजी घ्यावी लागेल, असा सल्ला सुदिन ढवळीकर यांनी दिला.
कोरोनावर अद्याप लस सापडलेली नाही. त्यामुळे या रोगाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. हे सरकारने लक्षात ठेवावे. जनतेच्या स्वैर वावरामुळे संसर्गाचा पुन्हा फैलाव झाल्यास परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल. त्यामुळे सरकारने आपल्या कृतीवर गर्व न करता गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. गेल्या दोन दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातून लोकांचा ज्या प्रकारे वावर चालल्याचा समाज माध्यमातून दिसून आला. त्यातून 144 कलमाचा भंग झाल्याचे दिसून येते. बेतोडय़ात एका आमदाराने परप्रांतीय मजुरांची धान्य वाटपाच्या नावाखाली केलेली गर्दी. ज्यातून सामाजिक अंतर किंवा इतर कुठलीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. लोकप्रतिनिधी अशाप्रकारे बेजाबदार वागून जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला.
एका दुचाकीवरून दोघा व्यक्तींना कामावर जाण्यास बंदी घालणे हे अयोग्य असल्याचे ढवळीकर म्हणाले. एकाच शहरात अथवा एकाच कार्यांलयात नवरा बायको कामाला जातात. मात्र ती एकाच घरी एकत्र राहतात. अशा परिस्थितीत बाहेर कामावर जाताना एकाच दुचाकीवरुन न जाता वेगवेगळे जाणे हे पटत नाही. सरकारने नियम बनविताना ते विचारपूर्वक करावेत.
सध्या दारु विक्रीवर बंदी असली तरी खुलेआमपणे दारु विक्री चालली आहे. मासळी, भाजीपाला, फळे यांच्या दरवार कुणाचेही नियंत्रण नाही. सामान्य माणसांना या वस्तू महाग विकत घ्याव्या लागत आहे, असेही सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.









